कोविड उपचार दूरच : ७ रुग्णालयांना बजावल्या होत्या नोटिसा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतील समाविष्ट रुग्णालयात मात्र कोविडवर मोफत उपचार केले जात नसल्याचे गंभीर चित्र समोर आले. त्यानंतर ७ रुग्णालयांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या योजनेची केवळ शासकीय रुग्णालयांमध्ये अंमलबजावणी केली जात असून, खासगीत मात्र त्याचा लाभ दिला जात नसल्याचे चित्र आहे.
जिल्हाभरात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत ३४ रुग्णालयांचा समावेश होतो. यात ३३ रुग्णालये खासगी आहेत. यातील ९ रुग्णालयांना कोविड उपचारांची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, या रुग्णालयांत रुग्णांना या योजनेंतर्गत कोविडचे उपचार मोफत मिळत नसल्याचे समोर आले आहे. कोविडमध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजनेंतर्गत उपचार झालेल्या रुग्णांची संख्या अगदीच मोजकी असून, एकूण रुग्णसंख्येच्या केवळ तीन टक्के रुग्णांवर हे उपचार झाले आहेत.
दोनच रुग्णालयांत लाभ
जनआरोग्य योजनेचा रुग्णांना कोविड उपचारासाठी केवळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, तसेच डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या दोनच ठिकाणी लाभ मिळत आहे. जीएमसीत पूर्णत: मोफत उपचार केले जात असून, या योजनेत रुग्ण वाढावेत, यासाठी सेवालयात या योजनेचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
रुग्णालयांचे नियोजन
शासकीय यंत्रणेत रुग्णांना मोफत उपचार मिळत असले तरी या रुग्णांची नोंदणी महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत झाल्यास त्याचा लाभ मिळतो, हा पैसा रुग्णालय अन्य उपाययोजनांवर खर्च करू शकते, त्या दृष्टीने रुग्णांकडून कागदपत्रे घेऊन या योजनेत त्यांना समाविष्ट करण्याचे प्रयत्न प्रशासकीय पातळीवर केले जातात.
काय आहेत अडचणी
१ रुग्णांसोबत आवश्यक कागदपत्रे नसतात, बऱ्याच वेळा नातेवाईकही ते सोबत बाळगत नाहीत.
२ रुग्ण ग्रामीण भागातील असल्यास मग त्या ठिकाणाहून आवश्यक रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे येण्यास विलंब होतो.
३ खासगी रुग्णालये जी या योजनेत समाविष्ट आहेत व कोविडची परवानगी ज्यांना भेटली आहे, त्यांनी या योजनेत रुग्णांना लाभ देणे अपेक्षित असताना असे होत नाही. रुग्णालयांची उदासीनताही यात एक कारण आहे.
४ खासगी रुग्णालये जी योजनेत समाविष्ट आहेत, तेथे कोविडचे उपचार आपल्याला या योजनेतून मोफत मिळतील याची माहिती रुग्ण किंवा नातेवाइकांना नसते.
असा मिळेल लाभ
योजनेतील खासगी रुग्णालयांमध्ये आरोग्यमित्र नेमलेले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून योजना समजून घेऊन आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता केल्यास या योजनेतून निकषात बसणाऱ्या आजारांवर मोफत उपचार केले जातात.
लाभ अत्यंत कमी
शासकीय रुग्णालये कोविडसाठी राखीव ठेवल्यानंतर मध्यंतरी खासगी रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेची व्याप्ती वाढविण्यात आली होती. या ठिकाणी रुग्णांना मोफत उपचार मिळतील, अशी व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, बरीच रुग्णालये रुग्णांकडून पैसे घेत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या.
एकूण रुग्ण १३५१४२
एकूण बरे झालेले १२३०२९
एकूण मृत्यू २४१७
योजनेत उपचार झालेले रुग्ण ५०३७