जामनेर : पहूर चौफुलीवरील होलसेल किराणा दुकानाची मागील भिंत फोडून चोरट्यांनी सुमारे अडीचशे तेलाचे डबे, किराणा माल व रोख रक्कम असा सुमारे पाच ते सहा लाखांचा मुद्देमाल लांबवला. चोरीची घटना बुधवारी मध्यरात्री घडली.
अभय बोहरा यांच्या मालकीचे दुकान असून, बुधवारी रात्रभर रिमझिम पाऊस सुरू असल्याने चोरट्यांनी संधी साधली. चोरीचा माल वाहून नेण्यासाठी चोरट्यांनी वाहनाचा वापर केल्याचा संशय आहे.
घटनेची माहिती समजताच बोहरा यांनी तातडीने दुकान गाठले. पोलिसांनी पाहणी करून श्वान पथक व ठसे तज्ज्ञांना बोलविले. पावसामुळे सर्वत्र चिखल असल्याने श्वान निश्चित दिशा दाखवू शकले नाही.
पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी सहकाऱ्यांसोबत पाहणी केली. पोलिसांत याबाबत नोंद झालेली नव्हती. फिर्याद देणार असल्याचे बोहरा यांनी सांगितले.