जळगाव : शहरातील कोल्हे हिल्स भागात राहणाऱ्या, बांधकाम मजूर असलेल्या मामाने चाकूचा धाक दाखवून भाचीवर बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून तालुका पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
कोल्हे हिल्स भागात बांधकाम मजूर असलेला हा नराधम मामा पत्नी व लहान मुलीसह वास्तव्यास आहे. लहान मुलीचा सांभाळ करण्यासाठी जानेवारी महिन्यापासून पीडित मुलगी ही मामाकडे आली होती. दरम्यान, आठ दिवसांपूर्वी मामी गावाला गेली होती, तर पीडित ही घरात टीव्ही पाहत होती. त्यावेळी, मागच्या खोलीत जा आणि कांदे साफ कर, असे मामाने सांगितल्यावर पीडिता मागच्या खोलीत आली. नंतर त्याठिकाणी नराधमाने चाकूचा धाक दाखवून भाचीवर बलात्कार केला.
आईला सांगितली संपूर्ण घटना...
दरम्यान, घडलेला संपूर्ण प्रसंग पीडितेने मामीला सांगितला. त्यानंतर तिला लागलीच घरी जाण्यास मामीने सांगितले. त्यानुसार तिला घरी सोडण्यास सांगितले असता, नराधमाने पीडित भाचीला मारहाण केली. त्यातच दोन ते तीन दिवसांपूर्वी घराजवळ राहणाऱ्या एका ओळखीच्या व्यक्तीला पीडितेने ही संपूर्ण घटना सांगितली. नंतर तिने आईशी संपर्क सांधून घडलेला प्रसंग सांगितला.
पोलिसात गुन्हा दाखल
संपूर्ण प्रकार ऐकल्यानंतर गुरुवारी पीडितेच्या आईने जळगाव गाठले. त्यानंतर मुलीला घेऊन त्यांनी तालुका पोलिसात धाव घेतली. नंतर घडलेली घटना पोलिसांना सांगितल्यानंतर पीडितेच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात नराधम मामाविरुध्द बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.