धुळे : जळगाव घरकूल प्रकरणाच्या न्यायालयीन कामकाजाची जबाबदारी जिल्हा सरकारी वकील अॅड.श्यामकांत रावजी पाटील यांच्याकडे सोपविण्यात आलेली आहे. याबाबत विधी व न्याय विभागाचा आदेश येथील जिल्हा सरकारी वकिलांच्या कार्यालयाला आज दुपारी प्राप्त झाला. यासंबंधी अहवाल जिल्हा सरकारी वकिलांनी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग दोन न्या.प्रदीप काळे यांच्याकडे सादर केला. शासन अधिसूचनेनुसार ९ मेपासून घरकूल प्रकरणाचे विशेष सरकारी वकील निर्मलकुमार सूर्यवंशी व त्यांचे सहायक अॅड.प्रवीण चव्हाण यांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याचे आदेशात नमूद आहे. या प्रकरणात नव्याने विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात अथवा पुढील आदेश होईपर्यंत जिल्हा सरकारी वकिलांकडे न्यायालयीन कामकाज सोपविण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. घरकूल प्रकरणात शासनाची परवानगी घेण्यासंदर्भात संशयित आमदार सुरेशदादा जैन यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यात न्या. ठिपसे यांनी अॅड.सूर्यवंशी यांच्यावर कडक शब्दात ताशेरे ओढले होते. न्यायालयीन अवमानाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्याचा निर्णय न्या.ठिपसे यांनी घेतला होता. जैन यांच्या वकिलांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे अॅड.सूर्यवंशी, अॅड.चव्हाण यांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीबाबत फेरविचार करण्याची मागणी केली होती. त्यानुसार मुख्यमंत्र्यांनी अॅड.सूर्यवंशी, अॅड.चव्हाण यांची नियुक्ती ९ मेपासून रद्द केल्याचे आदेश येथे प्राप्त झाले. त्याबाबत निर्माण झालेला गुंता व चर्चेला आज पूर्णविराम मिळाला आहे.
जळगाव घरकूलचे कामकाज जिल्हा सरकारी वकिलांकडे
By admin | Updated: May 18, 2014 01:14 IST