लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय खराब असून, नागरिकांचा रोष पाहता लवकरच शहरातील रस्त्यांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. मात्र, ही कामे डांबरी रस्त्यांची असून, शहरातील रस्ते दीर्घकाळ टिकण्यासाठी डांबरीऐवजी सिमेंटचे रस्ते होणे गरजेचे आहे. मात्र, मनपाकडे त्यासाठी निधीच नसल्याची बाब समोर येत आहे. त्यात मनपाकडे प्राप्त होणाऱ्या निधीतून जर सिमेंटचे रस्ते करण्याचे नियोजन मनपा प्रशासनाने केले तर शहरातील निम्म्यापेक्षा भागातील रस्ते होणेही कठीण होऊन जाईल, अशी माहिती मनपातील जाणकार नगरसेवकांनी दिली आहे.
त्यामुळे शहरासाठी नगरोत्थांतर्गत प्राप्त झालेले १०० कोटी व पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून मनपाला दिलेल्या ६१ कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील सुमारे ३० ते ४० रस्त्यांचे काम मनपाकडून केले जाणार आहे. तसेच मनपातील सत्ताधाऱ्यांनी भाजप काळात १०० कोटींपैकी ४२ कोटींच्या कामातून रस्त्यांव्यतिरिक्त घेण्यात आलेले इतर कामेदेखील रद्द करून, संपूर्ण १०० कोटींमधून रस्त्यांची कामे घेण्याचा ठराव बहुमताने घेतला आहे.
सिमेंटच्या रस्त्यांबाबत काय आहेत अडचणी
१. माजी महापौर नितीन लढ्ढा यांनी सिमेंटच्या रस्त्याबाबत येणाऱ्या अडचणींची माहिती दिली असून, यामध्ये प्रमुख अडचण ही निधीचीच आहे.
२. डांबरी रस्त्यांच्या तुलनेत सिमेंटच्या रस्त्यांच्या कामाला लागणारा खर्च दुप्पटचा आहे.
३. सिमेंटचे दर हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
४. डांबरी रस्त्यांची कामे १०० कोटी रुपयांच्या निधीतून शहरातील ७० टक्के भाग कव्हर करता येतो. मात्र, सिमेंटचे रस्त्यांची कामे घेतली तर शहरातील ३५ टक्केच भाग कव्हर होईल. इतर भागात रस्त्यांची समस्या कायम राहील.
५. सिमेंटच्या रस्त्यांना मोठ्या प्रमाणात विलंब लागतो व तेवढा संयम आता जळगावकरांकडे नाही.
६. मनपाकडे १०० कोटी रुपयांचा निधी गेल्या तीन वर्षांपासून ग्रहणाच्या फेऱ्यात अडकला आहे. त्यात अजून काही वेळ थांबलो तर डांबरी रस्तेही होणे कठीण होऊन जाईल.
७. त्यामुळे मिळालेल्या निधीतून गुणवत्तापूर्ण रस्ते तयार करण्याचे नियोजन मनपाचे असल्याची माहिती नितीन लढ्ढा यांनी दिली.
मुख्य रस्त्यांची कामे तरी सिमेंटची व्हावीत
शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात अमृत अंतर्गत भुयारी व पाणीपुरवठा योजनेचे काम जवळपास संपले आहे. त्यामुळे बाजारपेठ परिसरातील रस्ते तरी सिमेंटचे करण्याबाबत मनपा प्रशासनाने विचार केला पाहिजे. चोपडा, भुसावळ, पाचोरा नगरपालिकेला जर हे शक्य असेल तर मनपा प्रशासनाला का नाही?, विशेष म्हणजे शहरातील मुख्य ६ रस्ते मनपाकडून सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित झाल्याने या रस्त्यांवर मनपाकडून होणारा खर्चदेखील वाचणार आहे. त्यामुळे मनपा प्रशासनाने मुख्य बाजारपेठ भागातील रस्ते तरी सिमेंटचे करावेत, अशी मागणी होत आहे.