रेल्वे प्रवाशांची माहिती घेण्यासह ढाब्यांची तपासणी करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:25 AM2021-02-23T04:25:13+5:302021-02-23T04:25:13+5:30

जळगाव : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तत्काळ कठोर कार्यवाही करा, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सहकार, परिवहन, अन्न ...

Inspect the dhaba with information of railway passengers | रेल्वे प्रवाशांची माहिती घेण्यासह ढाब्यांची तपासणी करा

रेल्वे प्रवाशांची माहिती घेण्यासह ढाब्यांची तपासणी करा

Next

जळगाव : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी तत्काळ कठोर कार्यवाही करा, असे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी सहकार, परिवहन, अन्न व औषध प्रशासन आणि रेल्वे विभागास दिले आहे. यात बाहेरील जिल्ह्यातून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची माहिती घेण्यासह ढाब्यांची तपासणी करा, बाजार समितीमध्ये गर्दीवर नियंत्रण आणा, अशाही सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

दरम्यान, वारंवार सूचना देऊनही या बाबत नागरिक गांभीर्य दाखवित नसल्याने प्रशासनाने कठोर उपाययोजनांच्या दिशेने हालचाली सुरू केल्या असून सोमवारी या विषयी अनेक निर्बंधही घालण्यात आले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रभाव नियंत्रणात आणण्यासाठी करावयाच्या उपाययोजना संदर्भात जिल्हाधिकारी राऊत यांनी सोमवारी सहकार, परिवहन, अन्न व औषध प्रशासन आणि रेल्वे प्रशासन यांच्या प्रमुख अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बैठक घेतली. या बैठकीस जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई, उप प्रादेशिक परिवहन विभागाचे महेश देशमुख, अन्न व औषध प्रशासन विभागाचे उपायुक्त वाय. के बेंडकुळे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाचे प्रतिनिधी ए.के. पाठक, महानगरपालिकेच्या अपर आयुक्त विद्या गायकवाड, डॉ. राम रावलाणी आदी उपस्थित होते.

बाजार समितीमध्ये गर्दीवर नियंत्रण आणा

बाजार समितीमध्ये सकाळी घाऊक खरेदीदाराबरोबरच किरकोळ खरेदीदार गर्दी करतात. ती रोखण्यासाठी सहकार विभागाने कडक कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. गेल्या वर्षी कोरोनाच्या काळातच येथे मोठी गर्दी वाढली होती व संसर्ग वाढल्याने यंदा या विषयी दक्षता घेण्यासाठी आतापासून उपाययोजना केल्या जात आहे.

विनामास्क प्रवाशांवर कारवाईचे आदेश

परिवहन विभागाने विनामास्क प्रवाशी आढळल्यास कार्यवाही करावी. एसटी महामंडळाच्या तसेच खासगी बस, रिक्षांमधून जादा प्रवासी प्रवास करतात. अनेक प्रवासी मास्क न लावता प्रवास करतात त्यांच्यावर कडक कारवाई करावी,

बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची माहिती द्या

अमरावती, अकोला, मुंबई, पुणे व नागपूर या जिल्ह्यातून रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांची माहिती रेल्वे विभागाने उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. रेल्वे गाडीतून प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे की एकाच ठिकाणी गर्दी करून प्रवासी प्रवास करीत आहे हे तपासावे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

ढाब्यांचीही होणार तपासणी

अन्न व औषध विभागाने गर्दी होणाऱ्या उपाहारगृहात तपासणी करावी, गर्दी होणारे ढाब्यांवर तपासणी करावी. ग्राहकांना समोरासमोर न बसविता एक दिशेने बसवून सोशल डिस्टन्सिंग पाळणे गरजेचे आहे, असेही आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

विनामास्क फिरणाऱ्या ३७७ जणांवर कारवाई

महापालिकेने तपासणी केलेल्या कार्यवाहीची माहिती अपर आयुक्त विद्या गायकवाड यांनी बैठकीत दिली. यात ३७७ विनामास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात आली, १४ मंगल कार्यालये, १५ खासगी क्लासेसवर ही कार्यवाही करण्यात आल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली. डॉ. रावलाणी यांनी आरोग्यविषयक केलेल्या तयारीची माहिती दिली.

Web Title: Inspect the dhaba with information of railway passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.