तिसऱ्या दिवशीही आंदोलनाची दखल नाही
चाळीसगाव : गौताळा अभयारण्याच्या पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात कार्यान्वित फर्मी सोलर फार्मस प्रा. लि., व जेबीएम सोलर प्रा. लि., नवी दिल्ली या बेकायदा खासगी सोलर प्रकल्पाची शासन नियुक्त एसआयटीमार्फत चौकशी करून प्रकल्प पीडितांना न्याय द्यावा या मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे चाळीसगाव येथील शेतकरी बचाव कृती समिती व मोजक्या पीडित शेतकऱ्यांसह २१ पासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहेत. गुरुवारी तिसऱ्या दिवशीही उपोषण सुरूच होते.
गेल्या चार वर्षांपासून पीडित शेतकऱ्यांसह शेतकरी बचाव कृती समिती कायदेशीर मार्गाने शासन दरबारी न्याय मागूनही मिळाला नाही म्हणून त्या निषेधार्थ पीडित शेतकरी बेमुदत उपोषणाला बसले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पीडित शेतकरी व कृती समितीचे पदाधिकारी उपोषणाला बसले असून, त्यांना इतरांनी पाठिंबा दिला आहे.
जोपर्यंत शासनाकडून एसआयटी चौकशीचे आदेश काढत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याची माहिती शेतकरी बचाव कृती समितीचे सचिव भीमराव जाधव यांनी दिली. यावेळी शेतकरी बचाव कृती समितीचे अध्यक्ष ॲड. भरत चव्हाण, कार्याध्यक्ष किशोर
सोनवणे, सचिव भीमराव चव्हाण, प्राणीमित्र इंदल चव्हाण, देवेंद्र नायक, काशिनाथ जाधव, कांतीलाल राठोड, चत्रू राठोड, चिंतामण चव्हाण उपस्थित होते.
चर्चेसाठी महसूल मंत्र्यांच्या सचिवांकडून बोलावणे आले होते. परंतु, सचिवासोबत चर्चा नको, थेट सोलर प्रकल्पाच्या एसआयटी चौकशीचे आदेश हवे. त्यासाठी मुख्यमंत्री, महसूलमंत्री, ऊर्जामंत्री, व पर्यावरणमंत्री यांच्यापैकी कोणाशी चर्चा करू, असे कृती समितीने पोलिसांमार्फत मंत्र्यांच्या सचिवांना कळविले असल्याचे भीमराव जाधव यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
फोटो मॅटर मुंबईत आझाद मैदानावर चाळीसगाव तालुक्यातील सोलर पीडित शेतकरी व पदाधिकारी उपोषणाला बसले आहेत.