टोकियो: मंगळवारी टोकियो पॅरालिम्पिकचे उद्घाटन होणार आहे. त्यात भारतीय दलातील फक्त सहा अधिकारी आणि पाच खेळाडू सहभागी होतील, अशी माहिती भारतीय दलाचे मिशन प्रमुख गुरशरण सिंह यांनी रविवारी दिली.
उद्घाटन सोहळ्यात खेळाडूंच्या संख्येवर मर्यादा नाही. मात्र आतापर्यंत फक्त सात भारतीय खेळाडूच टोकियोत पोहोचले आहेत.
सातपैकी दोन टेबल टेनिस खेळाडू सोनल पटेल आणि भाविना पटेल यांची बुधवारी स्पर्धा आहे. त्यामुळे त्या उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणार नाहीत. जपानचे राजा नारुहितो हे स्पर्धेला सुरुवात करणार आहेत.
जे पाच खेळाडू उद्घाटन सोहळ्यात सहभागी होतील त्यातील ध्वजवाहक मरियप्पन थंगावेलु, थाळीफेकपटू विनोद कुमार, भालाफेकपटू टेकचंद आणि पॉवर लिफ्टर जयदीप, सकीना खातून यांचा समावेश आहे.
उद्घाटन सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सहापैकी चार अधिकारी ज्यात गुरशरण सिंह, उपमिशन प्रमुख अरहान बगाती, कोविड १९ चे मुख्य संवाद अधिकारी व्ही.के. डब्बास, आणि प्रशिक्षक सत्यनारायण आहेत.
भारतीय खेळाडूंचे तिसरे पथक सोमवारी रवाना होईल. त्यांना प्रशिक्षणाला परवानगी मिळण्याआधी विलगीकरणातून जावे लागेल.