सावखेडा, ता. रावेर : सुसाट वाहनामुळे वाढते अपघात होत आहेत. यात काहींचे बळीदेखील जात आहेत. गुरुवारी एका सुसाट जीपच्या धडकेने एका दोन वर्षाच्या चिमुकल्याचा बळी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आमोदा -पाल- भिकनगाव हायवेवर रोझोदा या गावाजवळ दिनांक २ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास मोटारसायकलस्वार खेमचंद्र मधुकर पाटील व त्यांची दोघं मुलं सोहम पाटील (वय १०) व ओम पाटील (वय २) हे मोटारसायकलने न्हावी येथून त्यांची सासरवाडी कळमोदा- खिरोदा मार्गाने रोझोदा या गावी जात असताना रोझोदा गावातील रोडवरील दूध उत्पादक संस्थेसमोरून गावात जात असताना रोझोदा बस स्टॅन्डवरून खिरोदाकडून पालकडे जाणाऱ्या भरधाव जीपने (१२ बीजी -०६२४ ) खेमचंद पाटील यांच्या मोटारसायकलला (एमएच १९- सीसी ४८४२) समोरून जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलच्या पेट्रोलच्या टाकीवर बसलेला ओम व खेमचंद पाटील आणि त्यांच्या मागे बसलेला त्यांचा मुलगा सोहम हे तिघे सिमेंटच्या रोडवर आदळले गेले. या घटनेनंतर अपघात जीपचालक तेथे न थांबता भरधाव वेगात गाडीसह खिरोदा-पाल रस्त्याने पसार झाला.
या अपघातामध्ये मोटारसायकलस्वार खेमचंद्र पाटील व त्यांची मुलं सोहम व ओम हे गंभीर जखमी झाले. त्यात त्यांचा दोन वर्षाचा मुलगा ओम याला ग्रामीण रुग्णालय सावदा येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. जखमींना सावदा येथील दवाखान्यात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
जीप ही पाल गावाजवळील वनविभागाच्या चेकपोस्टजवळ अडविण्यात आल्याने जीपचालक हार गाडी तेथेच सोडून जंगलात पसार झाला.
या अपघाताची माहिती मिळताच सावदा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक देवीदास इंगोले, पीएसआय राजेंद्र पवार व पोलीस कर्मचारी लगेच घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरा पाल गावाजवळ अपघातग्रस्त जीप गाडी ताब्यात घेतली.
आवश्यक ठिकाणी सूचना फलक गरजेचे
आमोदा -पाल -भीकनगाव या महामार्गावर काम सुरू असून कोठेही सूचना फलक नसल्याने वाहनधारकांसाठी ते धोकादायक ठरते. तसेच हायवेचे काम काही महिन्यांपासून संथ गतीने सुरू असल्याने येथे छोटे-मोठे अपघात होत असतात. या संथ कामामुळे रहदारीस मोठी अडचण होत आहे. तसेच रोझोदा गावाजवळील हायवेचे अपूर्ण काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. रोझोदा गावाजवळ हायवेवर हा अपघात झाल्याने गावाजवळ ठिकठिकाणी स्पीड ब्रेकर उभारावे, अशी मागणीही ग्रामस्थांमधून होऊ लागली आहे, जेणेकरून भविष्यामध्ये असे अपघात होणार नाहीत.
हीच ती पोलिसांनी जप्त केलेली जीप. (छाया : योगेश सैतवाल, सावखेडा)