कोविड लसीकरण : जेमतेम १०० डोसचा पुरवठा
लोकमत न्यूज नेटवर्क
ममुराबाद : परिसरातील धामणगाव आरोग्य केंद्रात शुक्रवारी कोविड प्रतिबंधक लसींच्या अपूर्ण पुरवठ्यामुळे मोठा गोंधळ उडाला. जेमतेम १०० लसींचा पुरवठा झालेला असताना रांगेत दुप्पट-तिप्पट नागरिक उभे राहिल्याने अनेकांना लस न घेताच निराश होऊन घरी परतावे लागले.
धामणगाव येथील आरोग्य केंद्रात सुरुवातीपासूनच अनियमित व अपूर्ण लसींचा पुरवठा जिल्हा स्तरावरून केला जात आहे. परिणामी, गर्दीवर नियंत्रण मिळविताना संबंधित आरोग्य यंत्रणेची पुरती दमछाक होताना दिसून आली आहे. एरव्ही सुमारे ४०० ते ५०० नागरिक रांगेत उभे असताना या आरोग्य केंद्राला जेमतेम १०० ते १५० कोविड लसींचा पुरवठा होत असतो. परिणामी, अनेकांना दिवसभर ताटकळत उभे राहिल्यानंतरही लस मिळेल याची कोणतीच शाश्वती नसते. अशाच प्रकारे शुक्रवारीसुद्धा नेहमीप्रमाणे १०० कोविशिल्ड लसींचा पुरवठा धामणगाव आरोग्य केंद्राला झाला होता. त्यातही पहिला व दुसरा डोस बाकी राहिलेल्यांना लस देण्यात येणार असल्याने आरोग्य केंद्राबाहेर सकाळपासूनच मोठी रांग लागली होती. महिला व पुरुष एकाच रांगेत असल्याने स्वाभाविकपणे गोंधळ उडाला. केंद्राचे प्रवेशद्वार उघडताक्षणी सर्वजण आतमध्ये शिरल्याने संबंधित यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली. प्रसंगी गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांनाही पाचारण करावे लागले. वाढती मागणी लक्षात घेता धामणगाव आरोग्य केंद्रांतर्गत कोविड प्रतिबंधक लसींचा पुरेसा पुरवठा करण्याची मागणी परिसरातून होत आहे.
----------------------
फोटो-
धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर शुक्रवारी कोविडची लस घेण्यासाठी झालेली गर्दी.