जळगाव : तालुक्यातील फुपनगरी भागातून गिरणा पात्रातून अवैधरित्या वाळू उपसा सुरू असून, वाळूमाफियांकडून गावातील अनेक भागात अवैधरित्या वाळूचे ठिय्ये मांडले जात आहेत. तसेच ग्रामस्थांकडून विरोध झाल्यास वाळूमाफियांकडून धमकी दिली जात असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून केल्या जात आहेत. या भीतीमुळे वाळूमाफियांना कोणाकडूनही विरोध होत नसून, यामध्ये जिल्हा प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
आव्हाण्यात कृषी महोत्सव
जळगाव : अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरुकुलपीठतर्फे रविवारी आव्हाणे येथील विठ्ठल मंदिर येथे कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात कृषी सहाय्यक अधिकारी ज्ञानेश्वर सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रगतशील शेतकरी जनार्धन चौधरी, सुकदेव चौधरी, दिलीप चौधरी, रवींद्र चौधरी यांच्यासह गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.
दूध फेडरेशनकडील रस्त्यावर महापौरांनी दिली भेट
जळगाव : शहरात एलईडी दिवे बसविण्याचे काम जोरात सुरू असून, महापौर भारती सोनवणे स्वतः फिरून नागरिकांशी चर्चा करीत आहेत. सुरत रेल्वे गेटपासून निमखेडी मुख्य रस्त्यावर एलईडी बसविण्याचे काम पूर्ण झाले असून, रविवारी पहाटे ५.३० वाजता जाऊन नागरिकांशी चर्चा केली. पूर्वी ज्या रस्त्यावरून मॉर्निंग वॉक करताना मोबाईलचा टॉर्च लावून फिरावे लागत होते, त्या रस्त्यावर आज आम्ही बिनधास्त फिरत आहोत, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. महापौरांनी सुरत रेल्वे गेटपासून निमखेडीपर्यंत पायी फिरून एलईडीची पाहणी केली. यावेळी महापौरांसोबत भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, विद्युत विभाग सभापती गायत्री राणे, नगरसेवक कैलास सोनवणे, डॉ. चंद्रशेखर पाटील आदींचा सहभाग होता.
मोकाट श्वानांच्या हल्ल्यात गाय ठार
जळगाव : शहरातील मोकाट श्वानांची समस्या दिवसेंदिवस वाढत असून, शनिवारी घनकचरा प्रकल्प शिवारात मोकाट श्वानांनी एका गायीवर हल्ला केला. यामध्ये गाय ठार झाली आहे. याआधीदेखील या भागात एका म्हशीचा फडशा पाडला होता. भरदिवसा या भागात जायलादेखील आता शेतकरी धजावत नसून, आता मोकाट श्वानांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.