सीसीटीव्हीचा डीव्हीआर नेला, तरीही कैद झालेच
पिंटू इटकर यांच्या बंगल्यात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आलेले आहेत. त्यातील एका कॅमेऱ्याचा डीव्हीआर काढून दरोडेखोरांनी नेलेला आहे तर दुसऱ्या एका कॅमेऱ्यात तीन जण कैद झालेले आहेत. लोखंडी गेटवरून उडी घेऊन आतमध्ये येतांना व वरच्या मजल्यावर जातांना स्पष्टपणे दिसून येत आहे. सर्वांचे वय साधारण २५ ते ३५ वयोगटातीलच आहे. दरोडेखोर हे सराईत नसावेत, ते स्थानिकच असल्याची शक्यता अधिक वाटत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
कौटुंबिक वादाचीही पडताळणी
पोलिसांनी या घटनेविषयी खोलात जाऊन चौकशी केली असता पिंटू इटकर यांचा शहापूर (मध्य प्रदेश) येथील नातेवाइकांशी वाद झालेला आहे. त्यात गुन्हे दाखल होऊन दांपत्याला अटकपूर्व जामीन मिळालेला आहे. त्या वादातून तर ही घटना घडली नाही ना? या दृष्टीनेही पोलिसांनी तपासाची चक्रे फिरविली आहेत. त्याशिवाय बांबरुड येथेही नातेवाईक आहेत, तेथे देखील अशीच घटना काही महिन्यापूर्वी घडली होती, तसाच काही प्रकार येथे घडला असावा का? ही देखील शक्यता पडताळली जात आहे.
एस.पींनी जागेवरूनच हलविली सूत्र
या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, स्थानिक स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले, तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक रविकांत सोनवणे आदींसह कमर्चाऱ्यांचा मोठा ताफा घटनास्थळावर दाखल झाला. डॉ. मुंढे व गवळी यांनी साधारण एक तास बंगल्याची बारकाईने पाहणी केली व इटकर दांपत्याकडून घटनेची माहिती जाणून घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बकाले यांनी त्यांच्या स्टाफला परिसरातील सीसीटीव्ही फुटेज संकलित करण्यासह नातेवाईक, संपर्कातील लोक व संशयितांची माहिती काढण्याबाबत सूचना करून पथके रवाना केली.