अविनाश आदीक : जामनेरला आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
जामनेर : मी पुन्हा येईन व अजित पवारांना घेऊन येईन, अधिकारी ऐकत नसतील तर त्यांच्या बदल्या झाल्याच पाहिजे. नेत्यांसमोर आपल्या व्यथा मांडीन, पक्षाने साथ दिली तर जिल्ह्याला चांगले दिवस येतील, यशही मिळेल, असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे निरीक्षक अविनाश आदिक यांनी शुक्रवारी सायंकाळी जामनेर येथील आढावा बैठकीत केले.
संजय गरुड यांच्या पाठीमागे कृतीतून उभे राहू, असेही आश्वासन त्यांनी कार्यकर्त्यांना दिले. या बैठकीत तालुक्याचे नेते संजय गरुड यांनी कार्यकर्त्यांच्या भावना आदिक यांचे समोर मांडल्या. माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर म्हणाले की, सत्ता आपली असली तरी अधिकाऱ्यांची साथ नसल्याने कामे होत नाही. कामे होत नसल्याने कार्यकर्ते नाराज होतात, ही बाब वरिष्ठांपर्यंत पोहचली पाहिजे. अशी स्थिती असेल तर यशाची अपेक्षा का करता? असा सवालही त्यांनी केला.
जामनेरमधील अधिकाऱ्यांची मस्ती जिरवली पाहिजे, असे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर संजय गरुड, तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, किशोर पाटील, डिगंबर पाटील, प्रदीप लोढा, डॉ. प्रशांत पाटील, पप्पू पाटील, विलास राजपूत उपस्थित होते.