कोरोनाच्या काळात नात्यागोत्यातील माणसं एकमेकांपासून दूर पळत होती... तर हमीदा कुटुंबासाठी झटत होती...
व्हॅक्सिन घेण्यासाठी गेलो. त्याआधी टेस्ट करून घेतली. कुठलाही त्रास नाही तरी पॉझिटिव्ह आलो आणि थोडा हादरलो. सर्व नियम पाळून,काळजी घेऊनही कोरोनाच्या तावडीत सापडलो, याचे शल्य त्याक्षणी जाणवलं. कुठलाही वेळ वाया न घालवता तडक अमळनेर येथील हॉस्पिटलला ॲडमिट झालो. घरी पत्नी अस्मिताशी फोनवर बोललो तीही काळजीत पडली. मुलगा क्षितिज आणि तिला घरीच क्वारंटाइन व्हायला सांगितलं. कामवालीबाई हमीदा आल्याबरोबर अस्मितानं तिला जाणीव करून दिली आणि पंधरा वीस दिवस कामाला येऊ नकोस, तुझे पैसे बुडणार नाहीत असं सांगून पाठवून दिलं. तीचही बरोबर होतं.
तिला लहान मुलंबाळं आहेत. आपल्यामुळे बिचारीला काही होऊ नये, या जाणीवेने तिने पटकन हा निर्णय घेतला. घरात काही ने-आण करण्यासाठी क्षितिजच्या मित्रांनी जबाबदारी घेतली. ते बाहेरूनच जेवण वगैरे ठेवून जायचे. या काळात शेजारी-पाजारी लोकांनी जणू काही आमच्या घरावर बहिष्कारच टाकलेला जाणवला. आमच्या घराच्या आसपासही कोणी फिरकलं नाही की विचारपूस केली नाही. त्यांचंही बरोबरच होतं. यांच्यामुळे आपल्यालाही कोरोना होईल ही भीती त्यांच्याही मनात होती. त्यांनी त्यांच्या काळजीपोटी तसं करणं स्वाभाविक होतंच. पुढे याच्यातले बरेच पॉझिटिव्ह निघाले आणि मुलाने त्यापैकी बर्याच जणांना कोरोनाला न घाबरता कुठेना कुठे बेड मिळवून दिला.
दुसर्याच दिवशी सकाळी हमीदा दारात तिच्या दोन्ही मुलींना घेऊन कामासाठी हजर झालेली पाहून पत्नीला आश्चर्य वाटले. कामाला न यायची ताकीद देऊनही हमीदा कामाला आली होती.
"अरे, हम क्वारंटान हैं, तुझे आनेको नही बोला था..."
पत्नीने तिला पुन्हा एकदा घरी पाठवण्याचा प्रयत्न केला. पण तिने ऐकलं नाही. ती म्हणाली, "कुछ नही होता मॅडम, मैं घर पे रहूंगी तो आपका काम कौन करेगा, सरभी ॲडमिट है. दादू के पपाने कहा सरके यहा काम चालू रखना. कलही हमने नमाज के वक्त सरके लिए अल्ला ताला से दुवाए मांगी है. सर जल्द घर आऐंगे...!!
" तिच्या बोलण्याने पत्नीच्या डोळ्यांत अश्रू तरळले. या महामारीच्या,सांप्रदायिकतेच्या काळात आपलीच नात्यागोत्यातील माणसं
एकमेकांपासून दूर पळत असताना शेजार पाजाऱ्यांनी तोंडे फिरवली असताना जी आपल्या रक्ताच्या नात्यातली नाही, जिचे जात, धर्म वेगळे आहेत आणि विशेष म्हणजे जिला घरी राहूनही कामाचा मोबदला मिळणार होता, ती घरात कोरोनाचे रुग्ण असूनही घरकामाला तयार असल्याचे सांगते. ही तर मानवतेपेक्षा मोठी गोष्ट आहे. हमीदाने अल्लातालाला मागितलेल्या दुवामुळे मी पाचच दिवसांत घरी आलो.
लगेच पत्नीलाही ॲडमिट व्हावे लागले. तिही सहा दिवसांत बरी होऊन घरी आली. पुढचे वीस दिवस आम्ही घरातच राहिलो. या काळात हमीदाने कोरोनाला न घाबरता घर पुसण्यापासूनची कामं केली. विचारपूस करून आमची काळजी घेतली. तिला आणि तिच्या परिवाराला आमच्यामुळे कुठलीही बाधा झाली नाही याचे समाधान वाटले. ईदच्या दिवशी तिने तिच्या हाताने घरून बनवून आणलेला शीरखुरमा आनंदाने खाताना आणि तिच्या मुलींच्या हातात ईदी देताना आम्हीही आमच्या घरी ईद साजरी करत होतो.
-डॉ. संजीवकुमार सोनवणे, धरणगाव