कजगाव, ता. भडगाव : येथून जवळच असलेल्या मळगाव, ता. भडगाव येथील मीराबाई गायकवाड यांच्या शेतातील अंदाजे दीड ते दोन एकर क्षेत्रातील उभ्या कपाशीची झाड अज्ञात व्यक्तीने उपटून फेकल्याने मोठे नुकसान झाले होते. यासंदर्भात ‘लोकमत’मध्ये ठळक सविस्तर वृत्त प्रसिद्ध झाले होते. या नुकसानीने हवालदिल झालेल्या या महिलेच्या मदतीसाठी टाकरखेडा, ता. एरंडोल येथील शरद रमेश पाटील हे धावून आले आणि त्यांनी ११ हजार रुपयांची मदत देऊन या महिलेस धीर दिला.
मळगाव येथील रहिवासी मीराबाई गायकवाड यांच्या शेतात एका अज्ञात व्यक्तीने २ एकर जमिनीतील उभ्या कपाशीचे पीक उपटून नासधूस केली. यात साधारणतः ५० ते ६० हजारांचे नुकसान झालेले असून मोलमजुरी करणारी व शेतीवर अवलंबून असणाऱ्या मीराबाई गायकवाड यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती.
त्यांच्या मदतीसाठी शरद रमेश पाटील (टाकरखेडे) यांनी धावून येत मदतीचा हात पुढे केला. यावेळी टाकरखेडे सरपंच प्रवीण रमेश पाटील, समाजसेवक निवृत्ती सपकाळे, पंकज चव्हाण हे उपस्थित होते. तांदूळवाडी गावातील सरपंच सीताराम पवार, तंटामुक्ती अध्यक्ष जयवंत पाटील, पोलीस पाटील किरण बागुल, ग्रामपंचायत सदस्य, समाजसेवक सिद्धार्थ बागुल, पत्रकार प्रल्हाद पवार उपस्थित होते.