नांद्रा, कुरंगी, सामनेर, दहिगाव संत, बाबरूड, आसनखेडा, पहाण, हडसण, खेडगाव नंदीचे, दुसखेडा, गोराडखेडा, मोहाडी या नांद्रा मंडळात येणाऱ्या गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू असताना दि. २२ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजल्यापासून पावसाचा जोर खूपच वाढला. या पावसाची १०५ मिलीमीटर नोंद करण्यात आली आहे.
पावसामुळे शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. नांद्रा येथे बोरसे गल्लीतील भास्कर त्र्यंबक बाविस्कर यांच्या मालकीचे असलेले मातीचे घर संपूर्ण कोसळले. सुदैवाने त्यात कोणी राहत नसल्याने जीवितहानी झाली नाही. त्या घरातील जीवनाश्यक वस्तू, भांडी, पाण्याची टाकी, अन्नधान्य, शेतीची अवजारे व इतर संसारोपयोगी वस्तू दबल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दुसरीकडे शेतकऱ्यांचे नगदी पीक समजल्या जाणाऱ्या कापसाच्या कैरी काळ्या पडून कुजल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घरासह पिकांचा पंचनामा होऊन नुकसान भरपाई मिळण्याची मागणी बळीराजा करीत आहे.
तालुक्यातील नुकत्याच झालेल्या पावसाने ज्या भागात घरे व शेतीचे नुकसान झालेले आहे, त्यांचे पंचनामे लवकरच करण्यात येतील.
-कैलास चावडे, तहसीलदार, पाचोरा
230921\23jal_8_23092021_12.jpg~230921\23jal_9_23092021_12.jpg
नांद्रा परिसरात मुसळधार पावसाने झोडपले~नांद्रा परिसरात मुसळधार पावसाने झोडपले