३१ ऑगस्ट, त्यानंतर ७ सप्टेंबर रोजी आणि मंगळवारी सायंकाळी पुन्हा पूरस्थिती निर्माण झाल्याने महसूल प्रशासनाने नदीकाठावरील नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. गत २२ दिवसांत तितूरला तिसऱ्यांदा पूर आल्याने ३१ ऑगस्टच्या महापुराच्या कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या.
तालुक्यात सोमवार अखेर ९१७.७३ इतके विक्रमी पर्जन्यमान झाले आहे. तहसीलदार अमोल मोरे हे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. त्यांनी नव्या पुलावर जाऊन तितूरच्या पूरस्थितीचा आढावा घेतला.
विक्रमी पर्जन्यमान झाले असून पाऊस अजूनही सुरूच असल्याने खरीप हंगामाचा चिखलच झाला आहे.
ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने मदत द्या - आमदारांची मागणी
अतिवृष्टी व पुराचे पंचनामे सुरू असताना पुन्हा पुराने धडक दिल्याने तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा. पूरग्रस्तांसह शेतकऱ्यांना सरकारने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी आमदार मंगेश चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना केली.
........
चौकट
कपाशीला मोठा फटका
अगोदरच अतिवृष्टीने कपाशी पिकाचे अतोनात नुकसान झाले असल्याने पुन्हा आलेल्या पावसाने कपाशी पिकाचा चिखल करून टाकला आहे. अति पावसामुळे जमिनीलगतची कपाशी बोंडे सडण्यास सुरुवात झाली आहे. शेतातून पाण्याचा निचरा होत नसल्याने पानेही लाल पडू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात आभाळ दाटून आले आहे. बाजरी, ज्वारी पिकेही मातीमोल झाली असून सततच्या पावसाने हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. काढणीला धान्य आणि काढून ठेवलेली कणसे काळी पडणार आहे. दरम्यान, मका पिकास हा पाऊस लाभदायी ठरणार आहे.
........
चौकट
‘मन्याड’मधून विक्रमी पाण्याचा विसर्ग
नांदगावसह मन्याड परिसरातही दमदार पाऊस होत आहे. यामुळे अगोदरच ओव्हरफ्लो झालेल्या मन्याड धरणातून विक्रमी पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सोमवारअखेर सुरू असलेला एक हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग १५ ते २० हजार क्युसेकपर्यंत पोहोचला आहे.
1...नांद्रे, पिलखोड, सायगाव या नदीकाठावरील गावांनी सतर्क राहावे, असे सूचना गिरणा पाटबंधारे विभागाचे उपअभियंता हेमंत पाटील यांनी दिली आहे.