१. शहरातील रस्त्यांची स्थिती अतिशय बिकट झाली असून, गेल्या चार ते पाच वर्षांपासून जळगावकर खराब रस्त्यांच्या समस्येला सामोरे जात आहेत. मंगळवारी झालेल्या पावसानंतर शहरातील खड्डेमय रस्त्यांवर पावसाचे पाणी साचले असून, त्यामुळे खड्ड्यांच्या खोलीचा कोणताही अंदाज वाहनधारकांना लावत येत नव्हता.
२. केसी पार्क परिसर, गणेश कॉलनी चौक, दूध फेडरेशन परिसर, शिवाजीनगर, शनिपेठ, रिंगरोड, निमखेडी परिसर, जुने जळगाव या भागात तर रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक वाहनधारक अक्षरश: रस्त्यांवर घसरले. यामध्ये काही वाहनधारकांना किरकोळ दुखापतदेखील झाली.
३. अमृतअंतर्गत खोदण्यात आलेल्या चाऱ्यांची दुरुस्तीदेखील मनपाकडून करण्यात आलेली नाही. यामुळे एस. के. ऑईल मिल परिसर, दांडेकर नगर, आर. आर. विद्यालय परिसर, शनिपेठ या भागात रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात चिखल पसरला होता. अनेक वाहनधारकांची वाहने या चिखलावर घसरत असल्याचे पाहायला मिळाले.
रस्ते दुरुस्तीच्या कामाचे पितळ उघड
मनपाकडून शहरातील काही भागातील रस्त्यांची दुरुस्ती ही पावसाळ्यादरम्यानच करण्यात आली होती. दुरुस्ती केल्यानंतर पावसाने दडी मारल्याने मनपाच्या या ढिसाळ कामाचे पितळ उघडे पडले नव्हते. मात्र, मंगळवारी झालेल्या जोरदार पावसानंतर ज्या भागात रस्त्यांची दुरुस्ती झाली होती. त्या रस्त्यांची अक्षरश चाळण झाली आहे. नवसाचा गणपती मंदिरमागील रस्ता, ख्वॉजामिया चौक, एस. एम. आय. टी. महाविद्यालय परिसर या भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीवर खर्च करण्यात आलेला संपूर्ण खर्च पाण्यात गेला आहे.
परिसरात झालेला पाऊस
जळगाव शहर - ५३ मिमी.
ममुराबाद परिसर - ३९ मिमी.
आव्हाणे परिसर - ४९ मिमी.
शिरसोली परिसर - ४३ मिमी.
कानळदा परिसर - ३९ मिमी.
आसोदा परिसर - ४३ मिमी.