जळगाव : वाहन घेण्यासाठी माहेरहून १० लाख रुपये आणावे यासाठी खेडी रोड येथील माहेर असलेल्या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करणाऱ्या पतीसह सासरच्या मंडळींविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खेडी रस्ता येथील चैताली यांचा विवाह अकोला येथील नीलेश मोहनसिंग राठोड यांच्याशी चार वर्षांपूर्वी झालेला आहे. लग्नानंतर पहिले तीन महिने चांगले गेले. त्यानंतर पतीने लहान-लहान गोष्टींमध्ये चुका काढून शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर वाहन घेण्यासाठी दहा लाख रुपये आणावे यासाठी छळ केला. त्यानंतर सासू पीयूषमा मोहनसिंग राठोड, नणंद भारती नितीन चव्हाण, नंदोई नितीन मधु चव्हाण (सर्व रा. अकोला), जेठ रोशन मोहनसिंग राठोड (रा. मलकापूर) यांनीही छळ केला. अखेर या त्रासाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. गुरुवारी विवाहितेच्या फिर्यादीवरून पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशोदा कणसे करीत आहेत.