चाळीसगाव : नगरपालिकेच्या ऐन निवडणुकीच्या तोंडावर गेल्या साडेचार वर्षात आपण शहर विकासासाठी काहीही ठोसपणे करू शकलो नाही. हे अपयश लपविण्यासह शहरवासीयांची दिशाभूल करणारी पत्रपरिषदच भाजपाने चार दिवसांपूर्वी घेतली. शहर विकासाच्या कोणत्याही योजनेत व कामात आम्ही कधीही खोडा घातला नाही. आम्हाला कुणाच्या सत्काराची गरज नाही. शहरवासीयांशी आमची नाळ जुळली. आम्हाला निवडून दिले हाच मोठा सन्मान आहे. सत्ताधाऱ्यांचेच हात बरबटलेले आहेत, असा थेट आरोप गुरुवारी दुपारी शविआने घेतलेल्या पत्रपरिषदेत केला.
पालिकेतील विद्यमान भाजपा सत्ताधाऱ्यांनी चार दिवसांपूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत शविआ विकास कामात बहुमताच्या जोरावर अडथळे निर्माण करते. हा आरोपही धादांत खोटा आहे. याउलट सत्ताधाऱ्यांमध्येच बेबनाव असून त्यांच्याच पक्षाच्या नगराध्यक्षांवरही त्यांनी आरोप केले आहे. साडेचार वर्षात दहा मुख्याधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. मुख्याधिकारी टिकत का नाही? या प्रश्नाचे उत्तर सत्ताधाऱ्यांनी द्यावे, असे आव्हानही शविआने पत्रकार परिषदेत दिले.
शविआ व त्यांच्या विचारसरीच्या नेतृत्वाने चाळीस वर्षाहून अधिक काळ पालिकेत नेतृत्व करताना शहराचा जातीय सलोखा कायम ठेवला. शांतता व बंधुभावाला प्राधान्य दिले. तथापि, भाजपाच्या गत साडेचार वर्षाच्या सत्ताकाळात शहरात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी व अवैध धंदे बोकाळले आहेत. चाळीसगाव पालिकेची एक प्रतिमा होती. तिलाही तडे गेले आहेत.
विकासकामे बिनचूक व्हावी. त्यांचा दर्जा चांगला असावा. यासाठी दुरुस्ती सुचवणे म्हणजे कामांना विरोध करणे होत नाही. हे म्हणजे सत्ताधाऱ्यांचे उलटा चोर कोतवाल को डाटे, असेच आहे, असा आरोपही शविआने केला.
पत्रपरिषदेला नगरसेवक भगवान राजपूत, रामचंद्र जाधव, दीपक पाटील, सूर्यकांत ठाकूर, शेखर देशमुख, रवींद्र चौधरी, सायली जाधव, सविता जाधव, वंदना चौधरी यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष रमेश चव्हाण, माजी नगरसेवक शाम देशमुख, प्रदीप राजपूत, सदाशिव गवळी आदी उपस्थित होते.
चौकट 1...
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचेदेखील राजकारण केले. सर्वानुमते पसंत केलेला पुतळा का बदलविण्यात आला ? याला घृष्णेश्वर पाटील, विजया पवार यांनी विरोध केला होता, असाही आरोप पाणीपुरवठा सभापती दीपक पाटील यांनी केला.
आम्हाला शहरवासीयांनी निवडून दिले आहे. त्यांच्याबाबत आमचे दायित्व आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांच्या सत्काराची आम्हाला मुळीच गरज नाही. शहरवासीयांनी आम्हाला निवडून दिले. हाच मोठा सन्मान आहे,असे रामचंद्र जाधव यांनी सांगितले.
मी शिक्षिका आहे. काहीतरी सेवा करावी म्हणून पालिकेत निवडून आले. मात्र गत साडेचार वर्षात प्रभागात एकही भरीव काम करता आले नाही. हे माझे दुर्दैव आहे. सत्ताधाऱ्यांनी नेहमीच दुजाभाव केला, अशी व्यथा सविता जाधव यांनी मांडली.