लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : माजी मंत्री गिरीश महाजन व चंद्रकांत पाटील यांच्या कार्यकाळातदेखील जिल्हा नियोजन समितीमधून ९९ टक्के निधीचे वितरण व तरतूद करण्यात आली होती. विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ९६ टक्के निधी वितरित केल्यानंतर केवळ स्वतःची पाठ थोपटून घेऊन गिरीश महाजन व चंद्रकांत पाटील यांच्यावर चुकीचे आणि तथ्यहीन आरोप केले असल्याची टीका शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.
रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून ९६ टक्के निधीचे वितरण करणारे आपण पहिलेच पालकमंत्री असल्याचे सांगितले होते, तसेच माजी मंत्री गिरीश महाजन यांनी त्यांच्या कार्यकाळात डीपीडीसीतून किती निधी वितरित केला, त्याची आकडेवारी सादर करण्याचे आव्हान पालकमंत्र्यांनी दिले होते. मंगळवारी अखेर सुरेश भोळे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे पालकमंत्र्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, माजी मंत्री गिरीश महाजन, तसेच माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या कार्यकाळात जिल्हा वार्षिक योजना (डी.पी.डी.सी.) जळगाव जिल्ह्यांतर्गत सन २०१६-१७ वितरित तरतुदीशी खर्चाची एकूण टक्केवारी ९९.०४%, सन २०१७-१८ अंतर्गत ९९.८७%, सन २०१८-१९ अंतर्गत ९९.६६% इतका निधी खर्च झालेला आहे. या निधीचे संबंधित विभागाचे अधिकारी, तसेच जिल्हाधिकारी व जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाद्वारे नियोजन होत असते, तसेच शासन स्तरावर प्रत्येक जिल्ह्यात याच प्रकारे निधी खर्च होत असतो. तरी यात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी डी.पी.डी.सी.अंतर्गत विकासकामांचे श्रेय घेऊन स्वतःची पाठ थोपटली आहे, असा दावा आमदार सुरेश भोळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.