दत्तक गावांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी 'ग्राम वाचन कट्टा'
विद्यापीठाचा उपक्रम : कवी, साहित्यिक साधतील ग्रामस्थांशी संवाद
सागर दुबे
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : शासनाच्या विविध योजनांचा अभ्यास करून गावांच्या विकासात, प्रगतीत प्रत्येक गावकऱ्यांचा हातभार लागावा यासाठी प्रत्येक नागरिकांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे गरजेचे आहे. म्हणूनच नागरिकांमधील वाचन संस्कृती लुप्त होऊ नये यासाठी आता रासेयो दत्तक गावात, वस्तीत, मोहल्ल्यात तसेच पाड्यात कवयित्री बहिणाबाई ग्राम वाचन कट्टा स्थापन करण्यात येणार आहे. २४ सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी करण्यात येणार असून त्याअनुषंगाने विद्यापीठाने सूचना केल्या आहेत.
राष्ट्रीय सेवा योजनेची स्थापना २४ सप्टेंबर १९६९ रोजी झाली. राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्य हे समाज सेवेशी निगडित आहेत. यामध्ये सहभागी स्वयंसेवक हे आपत्ती व्यवस्थापन, साथरोग, संसर्गजन्य आजार, नैसर्गिक व मानवनिर्मित आपत्ती संकटकाळी येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जातात. त्यातच राष्ट्रीय सेवा योजना एकक महाविद्यालयातर्फे तीन वर्षांसाठी एक गाव दत्तक घेण्यात येत असते. या दत्तक गावात दरवर्षी सात दिवशी विशेष श्रमसंस्कार शिबिर घेतले जाते. त्या माध्यमातून दत्तक गावाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व आरोग्यविषयक विविध समस्यांवर स्वयंसेवकांद्वारे काम केले जाते. दरम्यान, आता दत्तक गावांचा सर्वांगीण विकास व्हावा व गाव, वस्ती, पाड्यांमध्ये वाचन संस्कृती रूजावी यासाठी कवयित्री बहिणाबाई ग्राम वाचन कट्टा स्थापन करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
वर्षभर व्याख्यान, कार्यशाळा, अभियानासह विविध कार्यक्रमांची मेजवानी
कवयित्री बहिणाबाई वाचन कट्टांतर्गत वर्षभर विविध कार्यक्रमांची मेजवानी असेल. त्यात महाराष्ट्रातील कवी, लेखक, साहित्यिक, कथाकार, कादंबरी यांच्या साहित्यावर किमान २५ दिवसांतून एक व्याख्यान अर्थात वर्षभरात १० व्याख्यानांचे आयोजन केले जाईल. पाच चर्चासत्र, परिसंवाद तर कार्यशाळा तसेच दोन प्रकट मुलाखती, निबंध, काव्यवाचन अभिवाचन स्पर्धा वर्षातून तीन वेळा आयोजित केले जाईल. एवढेच नव्हे तर वाचन कट्ट्यात सहभागी विद्यार्थी, ग्रामस्थांना वाढदिवसाला पुस्तक भेट दिली जाईल. त्यासोबत वाचन कट्ट्यावर ई-बुकचे सामूहिक वाचन होणार आहे.
महिन्यातील एक दिवस 'नो इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट डे'
वाचन कट्ट्यांतर्गत महिन्यात एक दिवस हा 'नो इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट डे' साजरा केला जाईल. यात मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप, आयपॅड, संगणक आदी उपकरण न वापरता तो वेळ वाचनासाठी विद्यार्थी, नागरिक व वाचक देतील. विशेष म्हणजे, प्राथमिक शाळा, अंगणवाडी, समाज मंदिर हे वाचन कट्ट्याचे स्थळ असणार आहे.
अशी असेल नियंत्रण समिती
विशेष म्हणजे, कवयित्री बहिणाबाई वाचन कट्टा नियंत्रण समितीसुध्दा असणार आहे़ त्यात सरपंच समितीचे अध्यक्ष असतील. रासेयो एककाचे प्राचार्य उपाध्यक्ष तर कार्यक्रम अधिकारी कोषाध्यक्ष, मुख्याध्यापक सचिव म्हणून तर ग्रा.पं.सदस्य/आरोग्यसेविका/ अंगणवाडी सेविका किंवा आशा वर्कर समितीचे सहसचिव आणि ग्रामसेवक, तलाठी, पोलीस पाटील, कृषी सहाय्यक, आरोग्य मदतनीस, आजी-माजी रोसेयो स्वयंसेवक हे समितीचे सदस्य म्हणून असणार आहेत.