लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : तत्कालीन नगरपालिकेने सन १९९२ व १९९७ मध्ये चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यांची जम्बो भरती केली होती. नियुक्तीपत्र दिल्यानंतर तीनच दिवसात बहुतांश कर्मचाऱ्यांना उड्डाण पदोन्नती देत मजुराला अभियंता, कुलीवरून थेट डॉक्टर अशा पदांवर उड्डाण पदोन्नती देण्यात आल्या होत्या. याबाबत २०१९ मध्ये लेखापरीक्षण झाल्यानंतर शासनाकडे दिलेल्या प्रस्तावावर शासनाने आदेश काढत, मनपा अधिकाऱ्यांना दणका दिला असून, दोन दिवसात चतुर्थ श्रेणी पदावरून वर्ग एकच्या पदावर गेलेल्या अधिकाऱ्यांना मुळ पदावर आणण्याचा किंवा त्यांची पदोन्नती रद्द करण्याचे आदेश शासनाकडून काढण्यात आले आहेत.
हे प्रकरण जरी २५ वर्षांपुर्वीचे असले तरी या प्रकरणी आता लेखापरीक्षणाचा अहवाल प्राप्त झाल्यामुळे महापालिकेतील कर्मचाऱ्यांसह तत्कालीन पदाधिकारी व अधिकाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे. २०१९ मध्ये औरंगाबाद येथील लेखा परीक्षण समितीने मनपामध्ये दहा दिवस ठाण मांडून याबाबतची सर्व माहिती घेतल्यानंतर आता आपल्या अहवालात या पदोन्नतीबाबत आक्षेप घेतले होते. तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांना या प्रकरणी दोषी ठरविण्यात आले होते. याबाबत लेखा परीक्षण करून, याबाबतचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला होता. शासनाने याबाबतचे आदेश काढले असून, मनपातील अधिकाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे.
काय आहे प्रकरण
१. तत्कालीन नगरपालिकेत सन १९९१ व १९९७ मध्ये चतुर्थ श्रेणीतील जागा तत्कालीन पालिकेतील रोजंदारी कर्मचारी यांची भरती करण्यात आली. विशेष म्हणजे ही पदे भरताना समायोजन व समाज कल्याण कडून उमेवारांची यादी घेणे, जाहिरात देणे, अनुशेष काढणे व रोजंदारीच्या कर्मचाऱ्यांना प्राद्यान्य देणे असे नियम पाळणे आवश्यक असताना यावेळी केवळ रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्याचा एकच नियम पाळून भरती करण्यात आली.
२. ही भरती झाल्यानंतर त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. त्यानतंर काहींना एक किंवा दोन तर काहींना तीनच दिवसात चतुर्थ श्रेणीवरुन अभियंता, शाखा अभियंता, अधीक्षकांसह तांत्रिक पदांवर थेट उड्डाण पद्दोन्नती देण्यात आल्या. विशेष म्हणजे या भरती व पदोन्नत्यांवर लेखा परिक्षणात आक्षेप देखील आले होते. मात्र, त्यावेळेस याबाबत कोणतीही कारवाई झाली नव्हती.
काय म्हटले आहे आदेशात
१. राज्य शासनाकडून मनपाकडे प्राप्त झालेल्या आदेशात तत्कालीन मुख्यधिकारी व तत्कालीन नगराध्यक्षांवर या प्रकरणी कारवाई करणे कठीण असल्याचे सांगितले आहे.
२. सध्यस्थितीत उड्डाण पदोन्नती घेवून मनपात अधिकारी झालेल्या कर्मचाऱ्यांना मुळ पदावर आणण्यात यावे किंवा त्यांची पदोन्नती रद्द करण्यात यावी किंवा संबधित अधिकाऱ्यांचा वेतनावर शास्ती लावण्याचे आदेश शासनाने काढले आहेत.
३. जे कर्मचारी आता सेवानिवृत्त झाले आहेत. अशा कर्मचाऱ्यांच्या नावांची यादी शासनाकडे त्वरित जमा करण्याच्या सूचना मनपा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
अनेक कर्मचारी झाले सेवानिवृत्त, तर काही झाले मयत
महापालिकेत उड्डाण पदोन्नती घेणारे सुमारे ६७ ते ६९ कर्मचारी आहेत. त्यांना शिपाई, मजूर व कुली अशा पदांवरुन दोन ते तिन दिवसात थेट शाखा अभियंता, अधीक्षक तसेच तांत्रिक पदांवर बेकायदेशीररित्या बढती देण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांमधील बहुतांश जण आता सेवानिवृत्त झाले आहेत. तर अनेक जण मयत झाले आहेत. तर जे सध्या महापालिकेच्या आस्थापनेत आहेत. ते अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.