ऑनलाईन लोकमत
जळगाव,दि.5-महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे पेपर फोडून घोटाळा केल्याच्या प्रकरणात न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यात तारखांवर हजर राहत नसल्याने शहरातील दर्जी स्पर्धा परीक्षा क्लासेसचे संचालक गोपाल बाबुलाल दर्जी (वय 41, रा.जीवनमोती सोसायटी, जळगाव मूळ रा.बेटावद खुर्द, ता.जामनेर) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी दुपारी अटक करण्यात आली. त्यानंतर रात्री पोलीस बंदोबस्तासह मुंबई येथे नेण्यात आले.
एमपीएससी घोटाळा प्रकरणात 2002 मध्ये तत्कालीन अध्यक्षासह अनेक जणांविरुध्द मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने भादंवि कलम 409,418, 420, 465, 466, 467, 468, 471, 474, 477 (अ), 380, 381, 457, 201, 120(ब), 34,109 सह लाचलुचपत प्रतिबंधक कायदा कलम 13 (1) (ड) सह 5,7 आणि महाराष्ट्र प्रिव्हेंशन ऑफ मालप्रॅक्टिस अॅट युनिव्हर्सिटी बोर्ड अॅँड अदर स्पेशल एक्झामिनेशन अॅक्ट 1982 अन्वये 2002 मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यात दर्जी हे 15 व्या क्रमांकाचे आरोपी आहेत. मुंबई येथील 45 व्या क्रमांकाचे न्या.ए.डी.तनखीवाल यांच्या न्यायालयात हा खटला सुरू आहे. या खटल्याच्या तारखेवर दर्जी हजर राहत नसल्याने न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध अजामीनमात्र वॉरंट काढले होते.
दर्जी यांना ताब्यात घेतल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात अटकेची पूर्तता करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी पाच वाजता त्यांना जिल्हा पेठ पोलीस स्टेशनच्या कोठडीत ठेवण्यात आले.