फोटो
जळगाव : उत्तर महाराष्ट्रात सोनसाखळी चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केलेला आहे. तौफिक हुसेन जाफर हुसेन (वय १८, रा. भुसावळ) याच्यासह चोरीचे सोने विकत घेणारा हरिश्चंद्र दत्तात्रय इखनकर (वय २५, रा. भुसावळ) या दोघांना अटक करण्यात आली आहे. अटकेतील तौफिक याने आणखी दोघांसह १४ ठिकाणी केलेल्या गुन्ह्यांची कबुली दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
सोनसाखळी चोरी करणारे भुसावळ शहरातील असल्याची माहिती पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळाली होती. आरोपींच्या अटकेसाठी तयार केलेल्या पथकाच्या चौकशीत सोहेल अली युसूफ अली व अरबाज अली युसूफ अली (रा. भुसावळ) या दोघांची नावे समोर आली. हे संशयित भुसावळ येथून दुचाकीने पाचोरामार्गे मालेगावला जायचे. त्या भागात लासलगाव, निफाड व सिन्नर येथे सोनसाखळी लांबवायचे व मालेगावात मुक्काम करीत होते. या पथकाने तीन वेळा लासलगाव- मालेगाव- सिन्नर येथे संशयितांचा शोध घेतला. मात्र, ते मिळून आले नाहीत. मंगळवारी तौफिक हा भुसावळला आल्याची माहिती मिळताच पथकाने त्याच्या घरी छापा टाकला. तेथून त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर त्याने इतर दोघांची नावे सांगितली. चोरीचे सोने ज्या सराफाला विक्री केले, त्याचेही नाव सांगितले. त्यानुसार लागलीच सराफालाही ताब्यात घेण्यात आले, तर उर्वरित दोघे फरार असून, त्यांचा शोध सुरू आहे. या कारवाईत सहायक फौजदार अशोक महाजन, शरीफ काझी, युनूस शेख, किशोर राठोड, रणजित जाधव, विनोद पाटील, सचिन महाजन, वसंत लिंगायत, इद्रीस पठाण, मुरलीधर बारी व अशोक पाटील यांनी सहभाग घेतला.
याठिकाणी केले गुन्हे
या सर्व संशयितांनी भुसावळ शहरात ३, मालेगाव २, लासलगाव २, शिरपूर, नंदुरबार, चाळीसगाव प्रत्येकी १, निफाड व सिन्नर प्रत्येकी २, अशा १४ ठिकाणी सोनसाखळी लांबविल्याची कबुली दिली आहे.