विजयकुमार सैतवाल
जळगाव : गेल्या वर्षभरापासून सोने-चांदीच्या भावात मोठी वाढ झाल्यानंतर ते खरेदी करणे आवाक्यावर गेले असले तरी घरात असलेल्या सोन्याच्या भावावर ग्राहकांना अधिक लाभ मिळवून घेण्याची संधी गोल्ड मॉनिटायझेशन योजनेतून वाढली आहे. या योजनेंतर्गत बँकेत सोने ठेवण्याचे किमान प्रमाण ३० ग्रॅमवरून १० ग्रॅमवर आणले आहे, त्यामुळे याचा अधिक लाभ ग्राहकांना घेता येणार आहे. दरम्यान, या योजनेत सुवर्ण व्यावसायिकांनाही सामावून घेतल्याने त्याचा त्यांना फारसा लाभ होणार नसल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे. मात्र ग्राहक व बँक यांना लाभ होणार असल्याचे बँक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
गेल्या काही वर्षापासून केंद्र सरकारने गोल्ड मॉनिटायझेशन योजना आणून ग्राहकांना आपले सोने घरात न ठेवता बँकेत ठेवून त्यावर व्याज मिळविण्याची संधी उपलब्ध करुन दिली आहे. बँकेमध्ये सोने ठेवल्यानंतर संबंधित ग्राहकाला तेवढ्या किमतीचा बाँड करून दिला जातो. एक प्रकारे सोने हे ‘पेपर गोल्ड’ होऊन जाते. त्यानंतर ग्राहकाला यावर व्याज मिळते व सरकार या सोन्याचा वापर अर्थव्यवस्थेत करीत असते. मुदतीनंतर ग्राहकाने आपला बाँड (‘पेपर गोल्ड’) बँकेमध्ये जमा केल्यानंतर त्याला ते सोने परत मिळते. मात्र ते दागिन्याच्या स्वरुपात न राहता ते वितळून बिस्कीट अथवा नाण्याच्या स्वरुपात मिळते.
मर्यादा घटविल्याने अधिक लाभ घेता येणार
या योजनेमध्ये सोने ठेवण्याचे प्रमाण सरकारने घटविले आहे. पूर्वी किमान ३० ग्रॅम सोने बँकेत ठेवता येत होते. आता हे प्रमाण १० ग्रॅमवर आणले असून त्याचा अधिक ग्राहकांना लाभ घेता येऊ शकतो. विशेष म्हणजे ग्राहकाला यासाठी बँकेत लाॅकर घेण्याची गरज पडत नाही. सोने देऊन ग्राहकाला बँकेकडून पेपर स्वरुपात बॉँड मिळतो. गेल्या वर्षापासून कोरोनाच्या काळात सोन्यात गुंतवणूक वाढली आहे. सोबतच पूर्वीच्या तुलनेत मोठी भाववाढही झाली आहे. त्यामुळे आता सोने खरेदी करणे आवाक्याबाहेर असले तरी घरातील सोन्यावर कमाई करता येऊ शकते, असा सल्ला बँकांकडून दिला जात आहे.
अधिक मुदतीमुळे फारसा प्रतिसाद नाही
या योजनेंतर्गत मध्यम मुदत पाच ते सात वर्षांची तर दीर्घ मुदत १२ वर्षांची आहे. त्यामुळे एवढ्या दिवस सोने ठेवणे ग्राहकांकडून पसंत केले जात नाही. परिणामी महाराष्ट्र, उत्त्तर भारत या भागात या योजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे बँकांचे म्हणणे आहे. दक्षिण भारतात मात्र या योजनेचा अधिक लाभ घेतला जातो, असेही सांगण्यात आले.
सुवर्णव्यावसायिकांना लाभ नाही
ग्राहक व बँका यांना या योजनेचा अधिक लाभ मिळू शकतो, असे सांगितले जाते. आता या योजनेत सुवर्ण व्यावसायिकांनाही सामावून घेतले आहे. मात्र याचा सुवर्ण व्यावसायिकांना फारसा लाभ होणार नसल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. कारण सुवर्ण व्यवसायात भावातील चढ-उताराने गुतंवणुकीविषयी शाश्वती नसते, असे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
———————-
गोल्ड मॉनिटायझेशन योजनेचा ग्राहकांना अधिक लाभ घेता येऊ शकतो. घरात असलेले सोने ग्राहकांनी बँकेत ठेवल्यास त्यातून त्यांना कमाई करता येऊ शकते. याचा ग्राहकांना लाभ घेता येतो व त्यांचे सोनेही सुरक्षित राहते.
- अरुण प्रकाश, व्यवस्थापक, जिल्हा अग्रणी बँक.
गोल्ड मॉनिटायझेशन योजनेत सुवर्ण व्यावसायिकांना सामावून घेतले तरी त्याचा सुवर्ण व्यावसायिकांना फारसा फायदा होत नाही. त्यामुळे या योजनेकडे कोणी वळत नाही.
- अजयकुमार ललवाणी, अध्यक्ष, जळगाव सराफ बाजार असोसिएशन.