जळगाव : सुवर्ण अलंकारांसाठी हॉलमार्किंगसह आता प्रत्येत वस्तूंची नोंद ठेवण्यासाठी ‘ह्युड’चीदेखील (हॉलमार्क युनिक अँडेंटिफिकेशन नंबर) सक्ती करण्यात आल्याने या कायद्याच्याविरोधात सोमवार, २३ ऑगस्ट रोजी सुवर्ण व्यावसायिकांनी देशव्यापी एक दिवसीय बंद पुकारला आहे. या बंदमुळे जळगाव शहरातील १५०, तर जिल्हाभरातील दोन हजार सुवर्ण दुकाने बंद राहणार आहे.
सुवर्ण अलंकारांच्या शुद्धतेसाठी हॉलमार्किंगची सक्ती करण्यात आली आहे. यासोबतच केंद्र सरकारने सुवर्ण व्यवसायासाठी त्यांच्याकडे असलेल्या प्रत्येक दागिन्याची नोंद ठेवण्याची सक्ती केली आहे. या साठी ‘ह्युड’ (हॉलमार्क युनिक अँडेंटिफिकेशन नंबर) कायदा लागू करण्यात येणार आहे. यामध्ये सुवर्ण व्यावसायिकांकडे जितके अलंकार, सोने-चांदी आहे, त्याची नोंद ठेवावी लागणार आहे. या नोंदीच्या व्यतिरिक्त जास्त वस्तू सापडल्यास संबंधित सुवर्ण व्यावसायिकावर कारवाई केली जाऊ शकते. यासाठी अबकारी खात्याकडून तपासणी केली जाणार असून, त्यामुळे सुवर्ण व्यवसायात पुन्हा एकदा ‘इनस्पेक्टर राज’ येईल, असे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
नोंदी ठेवणार की व्यवसाय करणार
या कायद्यामुळे दररोज असणार माल, तो विक्री झाल्यानंतर त्याची तत्काळ नोंद अशी सर्व प्रक्रिया करावी लागणार आहे. यामुळे सुवर्ण व्यावसायिकांनी व्यवसाय करावा की लिपिक बनून नोंदी ठेवाव्यात, असा सवाल सुवर्ण व्यावसायिकांकडून केला जात आहे. सरकारने या कायद्याचा पुन्हा एकदा विचार करावा, अशी मागणी केली जात आहे.
या कायद्याच्या विरोधात सुवर्ण व्यावसायिकांनी एकत्र येत आपली दुकाने बंद ठेवावी, असे आवाहन जळगाव जिल्हा सराफ असोसिएशनचे अध्यक्ष गौतमचंद लुणिया, जळगाव शहर सराफ असोसिएशनचे अध्यक्ष अजयकुमार ललवाणी, सचिव स्वरूप लुंकड यांनी केले आहे.