लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी जिल्हा प्रशासनाने घालून दिलेले नियम कायम आहेत. त्यातच गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे लग्नसमारंभाच्या वऱ्हाडींच्या संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. त्यात परवानगीचा फार्स असल्याने वधू-वर पित्यांना परवानगी आणि अटींचे अग्निदिव्य पार पाडावे लागत आहे. तसेच भविष्यात कोरोनाची तिसरी लाटदेखील येण्याची शक्यता असल्याने आता मिळेल त्या मुहूर्तावर लग्न उरकावण्याची तयारी वधू-वर पित्यांनी केली आहे.
या आहेत अटी
आता लग्न समारंभासाठी कोरोनाच्या कडक निर्बंध काळात केवळ २५ जणांना परवानगी देण्यात आली होती. यामध्ये काहीअंशी शिथिलता आणून, लग्नाकरिता ५० लोकांना परवानगी देण्यात आली आहे. एकाच हॉलमध्ये २ तासात लग्न समारंभ आयोजित करता येऊ शकतो. लग्न समारंभात नियमांचं उल्लंघन केल्यास ५० हजार दंड ठोठावण्यात येईल. तसेच मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालनदेखील पाडणे गरजेचे आहे.
परवानगीसाठी अग्निदिव्य
-लग्न कार्यासाठी बुकिंग केलेल्या मंगल कार्यालयाचा अर्ज घेऊन, मनपाच्या प्रभाग समितीच्या अधिकाऱ्यांकडे हा अर्ज दाखविण्यात येतो. सोबतच वधू व वराचे आधारकार्ड जोडून महापालिकेने दिलेले अर्ज भरून घ्यावा लागतो.
-महानगरपालिकेची परवानगी मिळाल्यानंतर संबंधित पोलीस ठाण्यात अर्ज करावा लागतो. तिथेही मनपात दिलेली सर्व कागदपत्रे जोडावी लागतात. ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतून वर,वधू येणार असतील त्या पोलीस ठाण्याचीही ना हरकत घ्यावी लागते.
-परवानगीसाठी अनेक कार्यालयांची पायपीट करावी लागते म्हणून, मनपाने परवानगीसाठी एक खिडकी योजना अंमलात आणण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
शुभमुहुर्त
जुलै महिन्यात एकूण १० मुहूर्त असून, या मुहूर्तांवर बार उडविण्याची तयारी वधू-वर पित्यांनी केली आहे. १, २,३,१३,१८,२२,२५,२६,२८,२९ जुलै या तारखांना लग्नांचा मुहूर्त चांगला आहे.
कोट...
आपल्याकडे एक म्हण असते, ‘लग्न बघावे करून’ या म्हणीचा प्रत्यय लग्न करणाऱ्या पित्यालाच येत असतो. त्यात कोरोना काळात परवानगीसाठी ज्या प्रकारे एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयाकडे जावे लागते, त्यापेक्षा घरातल्या घरातच लग्न करणे परवडते.
-शोभा चौधरी, वराची आई
गेल्यावर्षीच मुलाचे लग्न ठरले होते. काही दिवसात कोरोनाची तीव्रता कमी होईल व परवानगींचा फार्स राहणार नाही असे वाटले होते. त्यामुळे तेव्हा लग्न थांबविले. मात्र, पुन्हा निर्बंध असल्याने मुहूर्त थांबवू शकत नाही. त्यामुळे परवानगी घेऊनच लग्न कार्य उरकवण्यावर भर आहे.
-रमेश पाटील, वरपिता