अमळनेर : कोरोनाचा संसर्ग अद्याप मिटलेला नाही, त्यामुळे श्रीगणेशाच्या आगमन व विसर्जनच्यावेळी मिरवणूक काढण्यास बंदी आहे आणि चार फुटाच्यावर मंडळांनी मूर्ती स्थापना करू नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांनी मूर्तिकार, बँड व डी. जे. मालकांच्या बैठकीत केले, तसेच ४५ जणांना कलम १४९ प्रमाणे नोटिसा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
गणेशोत्सव शांततेत आणि आरोग्यमय जावा, यासाठी पोलीस स्टेशनला विविध गणेश मंडळ, मूर्तिकार, बँड व डी. जे. मालक, चालक यांच्या स्वतंत्र बैठका पोलीस स्टेशनला आयोजित करण्यात आल्या होत्या. यावेळी पोलीस निरीक्षक हिरे यांनी सांगितले की, सजावट करताना भपकेबाजी नसावी. सार्वजनिक मंडळाचे गणपती चार फुटाच्यावर तर खासगी दोन फुटाच्यावर नको. दर्शनाची व्यवस्था केबल, ऑनलाइन, वेबसाईट, फेसबुक माध्यमातून करावी, मंडपात सोशल डिस्टन्ससिंग, सॅनिटायझर, निर्जंतुकीकरण केले पाहिजे, शक्यतोवर घरातील धातू, संगमरवर यांची पूजा करावी आणि शाडूच्या मूर्त्यांचे विसर्जन घरातच करावे, असे आवाहनही हिरे यांनी केले.
नियमांचा भंग होऊ नये, यासाठी दक्षता म्हणून ४५ जणांना कलम १४९ प्रमाणे नोटिसा देण्यात आल्या आहेत. बैठकीचे आयोजन गोपनीय शाखेचे पोलीस नाईक डॉ. शरद पाटील, पोलीस नाईक दीपक माळी, हितेश चिंचोरे यांनी केले होते. यावेळी डी. जे. चालक अविनाश जाधव, गणेश गुरव, गोपाळ बडगुजर, नीलेश महाजन, समीर पोतले, विनोद पाटील, राज माळी, आकाश चौधरी, मूर्तिकार संदीप कुंभार, बापू कुंभार, संजय भावसार, विक्रम पेंटर, लोटन कुंभार, प्रकाश कुंभार, किरण भावसार, रातीलाल पाटील, कुणाल निकुंभे, नारायण परदेशी हजर होते.