मुक्ताईनगर, जि. जळगाव : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुक्ताईनगर येथील पाहणी दौऱ्यात एका युवा शेतकऱ्याने ताफ्यातील गाड्या अडवत विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मुक्ताईनगर तालुक्यातील मेळसांगवे येथे मंगळवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. योगेश पाटील असे या शेतकऱ्याचे नाव आहे.
दुपारी फडणवीस यांच्या वाहनांचा ताफा त्याच्या शेताकडून जात होता. त्याचवेळी योगेश याने ताफा अडवून फडणवीस यांना आपल्या शेतात येऊन पाहणी करावी, अशी विनंती केली.
आपल्या शेतातील केळीबागेचे नुकसान झाले आहे. आपला दौरा फोटो सेशनसाठी असल्याचा आरोप त्याने केला. यावेळी योगेश याने सोबत विषाचा डबा आणला होता. तो पोलिसांनी जप्त केला. यानंतर फडणवीस यांच्या वाहनाचा ताफा पुढे मार्गस्थ झाला.