पहूर ता जामनेर :- शिवनगर भागातील रहिवाशांना पेठ ग्रुप ग्रामपंचायतच्या माध्यमातून सुमारे ८० जणांना मोफत ईलेक्ट्रॉनिक मिटर व कनेक्शन शासकीय योजनेतून शनिवारी मंजूर करुन दिले आहे. यामुळे सर्वसामान्य नागरीकांचा विजेचा प्रश्न मार्गी लागणार असून समाधान व्यक्त होत आहे.याप्रश्नी नागरिकांनी शुक्रवारी मोर्चा काढला होता. शिवनगर भागात वीज चोरी मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे या परीसरातील रोहित्र वारंवार जळत असल्याने वीज पूरवठा खंडित होत असतो.या वारंवारच्या त्रासामुळे नागरिक हैराण झाले आहेत. यासाठी महावितरणने केबल टाकण्याचे काम हाती घेतल्याने काही नागरिकांनी केबल टाकण्यास विरोध दर्शविला. वीज चोरी रोखण्यासाठी केबल चे काम पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे विद्युत पुरवठा अधिकच खंडीत होत आहे. या त्रासाला कंटाळून येथील काही नागरिकांनी पेठ ग्रामपंचायत वर मोर्चा काढला होता. हा रोष महावितरणच्या विरोधात असताना पेठ ग्रामपंचायतवर मोर्चा काढण्याचे षडयंत्र असल्याचे सत्ताधाऱ्यांनी सांगितले आहे.दरम्यान केबल टाकण्याच्या मोहिमेमुळे अवैध विज कनेक्शन धारकांचे धाबे दणाणले आहे.अधिकृत वीज जोडणीसाठी नागरिकांनी महावितरण कडे वेळ मागितला आहे. याची दखल घेऊन ग्रामपंचायत पेठने मोफत वीज कनेक्शन उपलब्ध करून दिल्याने विजेचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र मोठ्या वीज चोरांविरूध्द महावितरणने कारवाईचे हत्यार उपसण्याची अपेक्षा शिवनगर वासियांनी व्यक्त केली आहे.दरम्यान दोन दिवसात वीज मीटर वितरित केले जाणार असल्याची माहिती सरंपच निता रामेश्वर पाटील यांनी दिली आहे. तर वीज जोडणी साठी लागणारी सर्व कागदपत्रे उपलब्ध करून दिली आहे. यावेळी सेंट्रल रेल्वे बोर्डचे सदस्य रामेश्वर पाटील, भाजपा तालुका अल्प संख्याक अध्यक्ष सलीम शेख गणी, ग्रामपंचायत सदस्य संदीप बेढे, भारत पाटील, ईश्वर देशमुख, प्रकाश पाटील यांच्या सह लाईन मन उपस्थित होते.
पहूरच्या शिवनगरातील नागरिकांना मोफत वीज कनेक्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 16:45 IST