जळगाव : निती आयोगाच्या बनावट कागदपत्राचा वापर करून प्रशिक्षण केंद्र सुरू करण्याच्या नावाने पिंप्राळा येथील महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास सोसायटीच्या १८० केंद्रचालकांना ९४ लाख १४ हजार ८५३ रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून या साखळीतील मुख्य सूत्रधार अविनाश उर्फ अर्जुन कळमकर (रा. दैठणे गुंजाळ, ता. पारनेर, जि. अहमदनगर) याला आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे अडीच वाजता त्याच्या घरातून ताब्यात घेतले. कळमकर याच्यावर राज्यभर अशाच प्रकारचे फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल आहेत.
पिंप्राळा येथील योगिता उमेश मालवी (वय ३८) यांनी रामानंद नगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून मायभूमी ग्रामविकास संस्थेचा सचिव अविनाश उर्फ अर्जुन कळमकर, अध्यक्षा प्रीती विनायक खवले, उपाध्यक्षा प्रमिला अर्जुन कळमकर, खजिनदार कांचन दादाभाऊ ढगे, सदस्य शिवराम आप्पाजी जासूद, संगीता शिवराम जासूद व अर्जुन माधव कळमकर यांच्यासह इतर तीन अशा दहा जणांविरुद्ध रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. डिसेंबर २०१८ ते १५ जानेवारी २०२१ या कालावधीत कळमकर याने वेळोवेळी वेगवेगळ्या कारणाने १८० केंद्रचालकांकडून ९४ लाख १४ हजार ८५३ रुपये घेऊन फसवणूक केली आहे.
बीएचआरसारखीच कारवाई
या प्रकरणात बीएचआरसारखीच कारवाई झाली आहे. गुन्हा दाखल होण्याआधी कळमकर याची संपूर्ण माहिती व ठिकाणा प्राप्त करून घेण्यात आला. त्याच्या मागावर काही जण लावण्यात आले. रात्री पावणेबारा वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी लगेच आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक भास्कर डेरे यांना पथक रवाना करण्याचे आदेश दिले. उपनिरीक्षक संदीप पाटील, वसीम शेख व नितीन सपकाळे या तिघांचे पथक पारनेरला निघाले. पहाटे अडीच वाजता घरात झोपलेला असतानाच कळमकर याला अटक करण्यात आली. या वेळी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फौजदार विजय पाटील व संदीप साळवे यांची मदत घेण्यात आली.