लोकमत न्यूज नेटवर्क
भुसावळ : माजी आमदार संतोष चौधरी यांचा अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. संजय भन्साली यांनी गुरुवारी जामीन फेटाळला; मात्र अर्नेषकुमार व्हर्सेस बिहार खटल्याप्रमाणे पोलिसांना तपासाचे निर्देश देण्यात आल्याने चौधरींना अटकेपासून दिलासा मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
भुसावळच्या मुख्याधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल आहे. सत्र न्यायालयात आतापर्यंत २२, २४ व ३० जून रोजी जामिनावर युक्तिवाद केल्यानंतर न्यायालयाने १ जुलै रोजी निकाल जाहीर करण्यात येईल, असे सांगितल्याने निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते.
भुसावळातील सर्वोदय छात्रालयाच्या जागेवर अतिक्रमण झाल्याने जागेची पाहणी करण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी संदीप चिद्रवार हे सोमवार, १४ रोजी अधिकाऱ्यांसह गेले असता माजी आमदार चौधरी यांनी तेथे आल्यानंतर अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी चौधरी यांच्याविरुद्ध शासकीय कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.
संतोष चौधरी यांनी भुसावळ सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर २२ पर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला होता. एक जुलै रोजी न्या. संजय भन्साली यांनी चौधरी यांचा जामीन फेटाळला; मात्र अर्नेषकुमार व्हर्सेस बिहार २०१४ खटल्याप्रमाणे पोलिसांना तपासाचे निर्देश दिल्याने तूर्त चौधरी यांना अटकेपासून दिलासा मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.
न्यायालयात माजी आमदार चौधरी यांच्यातर्फे अॅड. जगदीश कापडे, अॅड. मनीष सेवलानी, तर सरकारतर्फे अॅड. विजय खडसे यांनी काम पाहिले. तपास सहायक निरीक्षक मंगेश गोंटला करीत आहेत.