अमळनेरात धुळवडीला उठल्या अग्नीच्या ज्वाला, धुराचे लोट आणि राखेचा धुराळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2021 11:31 AM2021-03-30T11:31:07+5:302021-03-30T11:31:44+5:30

धुळवडीला स्मशानभूमीत प्रेतं मावत नव्हती.

Flames of fire, plumes of smoke and ashes of dust rising in Amalnera | अमळनेरात धुळवडीला उठल्या अग्नीच्या ज्वाला, धुराचे लोट आणि राखेचा धुराळा

अमळनेरात धुळवडीला उठल्या अग्नीच्या ज्वाला, धुराचे लोट आणि राखेचा धुराळा

Next


संजय पाटील 
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : सरडा आणि माणसाप्रमाणे कोरोनानेही रंग बदलले असल्याने गेल्या वर्षापेक्षा भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा धुलिवंदनाला आनंदाचे रंग उधळण्याऐवजी दुःखाच्या अग्नीज्वाला, राखेचे ढीग आणि   धुराचे लोट उधळले.  धुलीवंदनाच्या दिवशी १५ अंत्ययात्रा निघाल्याने स्मशानभूमीत जिकडे-तिकडे प्रेतं जळत असल्याचे विदारक दृश्य पाहून सामान्यांचे काळीज जळत होते.

गेल्या वर्षापेक्षा यंदा कोरोनाने गुणधर्म बदलले असल्याचे निदर्शनास आले आहे. २९ रोजी ताडेपुरा स्मशानभूमीत सायंकाळी साडेसहापर्यंत १५ अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यापैकी ११ नगरपालिकेतर्फे करण्यात आले. शकुंतला केशरसिंग परदेशी रा.रामवाडी, भटू नथु चौधरी रा.संतोषी माता गल्ली, राजधर नथ्थु निकुंभ रा.शिवशक्ती चौक, कमलाकर नीळकंठ शिसोदे रा.डांगरी, अहिल्याबाई नवल पाटील रा.पाटील कॉलनी, कुबेर हरी माळी रा.अंबापिंप्री, सायंकाबाई गुलाब देवरे रा.पैलाड भवानी चौक, विश्वासराव चिंधा सोनवणे रा.हातेड, ता.चोपडा, कमलबाई राजधर निकुंभ रा.शिवशक्ती चौक, सीताबाई ठाकूर रा.बोरसे गल्ली, दामोदर रामचंद्र सोनवणे रा.पिंपळेरोड आनंद नगर यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

 स्मशानभूमीत एक प्रेत जळत नाही तोच दुसरे आणले जात होते. जिकडे तिकडे प्रेतं जळत होती. आधीच्या प्रेतांची राख पडलेली होती. काहींच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरू होती. धुलीवंदनाच्या दिवशी अग्नीच्या ज्वाला उसळत होत्या. धुराचे लोट आकाशात उठत होते. प्रेतांची राख उडत होती. हे सारे दृश्य पाहून सामान्यांचे काळीज भीतीने चुरचुरत होते.

नागरिक आधीच काळजी घेत नाहीत. बेफिकिरीने वागतात. नंतर त्रास होतो. तेव्हा धावपळ करतात आणि त्यावेळी रुग्णालयात बेड उपलब्ध होत नाही. ऑक्सिजन मिळत नाही. त्यावेळी प्रशासनाच्या नावाने आरडाओरड करतात. त्यापेक्षा चाचण्या करा आणि घरीच राहून तत्काळ उपाययोजना करा. म्हणजे अनर्थ घडणार नाही, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


   

Web Title: Flames of fire, plumes of smoke and ashes of dust rising in Amalnera

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.