शेंदुर्णी, ता. जामनेर: येथे मंगळावर दोन गटात झालेल्या दगडफेकप्रकरणी दोन्ही बाजूकडील २० संशयितांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. यात आणखी पाच जणांना शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटक करण्यात आलेल्यांची संख्या आता सात झाली आहे. या सर्वांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
दोन्ही गटाकडून कोणतीही तक्रार न आल्याने पोलीसच फिर्यादी झाले आहेत. मंगळवारी रात्री पारस चौक परिसरामध्ये दोन गटामध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. वादाचे पुनर्वसन दगडफेकीमध्ये होऊन यात अनेक जण जखमी झाले तर वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. इतर १३ आरोपींचा शोध सुरू आहे.
या घटनेमध्ये ४ चारचाकी, १० दुचाकी १ एसटी बस असे एकूण २० हजार १०० रुपयांचे नुकसान झाले. तर यामध्ये आठ ते दहा जण किरकोळ जखमी झाले होते. तर पोलीस उपनिरीक्षक, तीन पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले होते. पुढील तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवटे करीत आहेत.