अमळनेर : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यात साडेपाच हजार लाभार्थी वगळण्यात आले असून त्याची कारणे मात्र अधिकाऱ्यांना माहीत नसून सर्वाधिक प्रमाण इंदापिंप्री येथील असल्याने भाजपच्या माजी आमदार स्मिता वाघ यांनी वृद्ध, विधवा लाभार्थ्यांचे शिष्टमंडळ घेऊन गटविकास अधिकाऱ्यांना या संदर्भात जाब विचारला.
प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत अमळनेर तालुक्यात २६ हजार ४४४ लाभार्थ्यांचा सर्व्हे करण्यात आला. त्यानंतर लाभार्थ्यांची यादी जाहीर करण्यात आली. मात्र पुढील वर्षी काही नावे वगळण्यात आली तर काही नव्याने नावे वाढवण्यात आली. त्यात वगळण्याची कारणे स्थानिक पातळीवर ग्रामसेवक, गटविकास अधिकारी यांनादेखील माहीत नसल्याने नागरिक संभ्रमात पडले आहेत. निकष डावलून इन्कम टॅक्स भरणारे, नोकरीला असणाऱ्यांचे माता-पिता, भरपूर शेती असणारे, स्वतःचे घर असणारे, बागायती शेती असणाऱ्या लोकांची नावे लाभार्थी यादीत असून विधवा, भूमिहीन, निराधार, अल्पभूधारक असणारे खरे पात्र लाभार्थी वगळण्यात आल्याची ओरड इंदापिंप्री येथील ग्रामस्थांनी केली. या प्रश्नी लाभार्थी महिलांनी गटविकास अधिकारी एस.बी. सोनवणे यांना जाब विचारला. या वेळी भैरवी पलांडे, माजी पं.स. सभापती श्याम अहिरे, भाजपचे जिजाबराव पाटील, सदाबापू पाटील उपस्थित होते.
गटविकास अधिकारी एस.बी. सोनवणे यांनी दोन महिन्यांपूर्वी ५ हजार ४३५ लाभार्थी वगळण्याबाबत माहिती मिळाल्याचे सांगितले. मात्र आधी यादीत असलेली नावे का वगळण्यात आली याची कारणे माहीत नसल्याचे सांगितले.
इंदापिंप्री येथील यादीतील १८० पैकी ११७ लाभार्थी वगळण्यात आले आहेत. त्यात प्रामुख्याने विजूबाई पोपट पाटील, मंगलबाई रघुनाथ पाटील, कमलाबाई माणिक बोरसे, देविदास साहेबराव पाटील, रजूबाई रावण पाटील, अनिल ताराचंद पाटील, प्रकाश वेडुमल पाटील, दगूबाई भाईदास पाटील, नीलाबाई जगन्नाथ पाटील, निर्मलाबाई नवल भिल या कोणी विधवा, अल्पभूधारक, भूमिहीन, बेघर, आर्थिक दुर्बल असणाऱ्या पात्र लाभार्थींचा समावेश आहे.