फोटो : ५.०९ वाजेचा मेल
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : लक्ष्मीनगरातील माउली टेलर्स या दुकानाला बुधवारी मधरात्री २ वाजता शॉर्टसर्किटमुळे आग लागली. त्यात शिलाई मशीन, काउंटर, शिवून तयार केलेले ड्रेस व कच्चे कापड व कीर्तनाचे सामान असा अडीच लाखांचा ऐवज जळून खाक झाला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे.
संजय रामकृष्ण सोनवणे (रा.हनुमाननगर) यांचा टेलरिंगचा व्यवसाय आहे. लक्ष्मीनगरातील नंदू प्रभाकर लाड यांच्या जागेत त्यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. बुधवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास अचानक शॉर्ट झाल्याने दुकानात आग लागली. दुकानातून धूर निघत असल्याचे शेजारी राहणाऱ्या लोकांच्या लक्षात आले. त्यांनी जागा मालक नंदू लाड यांना ही माहिती दिली. लाड यांनीही लागलीच दुकानात आग लागल्याचे सोनवणे यांना कळविले. सोनवणे यांनी क्षणाचा विलंब न करता, दुकानाच्या ठिकाणी धाव घेतली. आगीवर सलग तीन तास पाण्याचा मारा करण्यात आला. गुरुवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळविण्यास सोनवणे यांना यश आले. तोपर्यंत आगीत दुकानातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले होते. त्यानंतर याबाबत त्यांनी पोलिसात माहिती दिली.
असा ऐवज जळून खाक
साधी शिलाई मशीन, इंटरलॉक मशीन, टीव्ही, ग्राहकांचे शिलाई केलेले ३० ड्रेसेस, विक्रीसाठी ठेवलेले १०० कापड, दोन पंखे, शिलाईसाठी लागणारे किरकोळ वस्तू, कीर्तनाचे साहित्य असा, एकूण अडीच लाख रुपयांचा ऐवज आगीत जळून खाक झाला आहे. याबाबत आकस्मिक आगीची नोंद करण्यात आली आहे.