जळगाव -शहरातील वाढत्या नागरी वस्त्यांचे क्षेत्र लक्षात घेता पिंप्राळा परिसरात लवकरच अग्निशमन दलाचे केंद्र उभारले जाईल, असे आश्वासन महापौर जयश्री महाजन यांनी मंगळवारी दिले.
जागतिक अग्निशमन सैनिक दिनानिमित्त गोलाणी व्यापारी संकुलातील तळमजल्यातील महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या केंद्रात मंगळवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महापौर बोलत होत्या. यावेळी केंद्रप्रमुख शशी बारी यांच्यासह विश्वजित गरडे, गिरीश खडके, तेजस जोशी, सय्यद नासीर अली, प्रकाश चव्हाण, सोपान जाधव, गंगाधर कोळी, राजेश चौधरी, दिवाण इंगळे, युसूफ पटेल, संतोष पाटील, मोहन भाकरे, संतोष तायडे आदींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उप-महापौर कुलभूषण पाटील हेदेखील यावेळी उपस्थित होते. महापौरांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना विविध सेवा-सुविधा देताना येणाऱ्या अडीअडचणी समजून घेतल्या. यावेळी कर्मचाऱ्यांनी सद्यःस्थितीत या केंद्राकडे जुन्या ३ व नव्या ४ अशा एकूण ७ फायर फायटर गाड्या उपलब्ध असून, एक गाडी बंदावस्थेत आहे. सध्याची असलेली जागा केंद्रासाठी अपूर्ण पडत असल्याचे सांगत नव्या जागेत या केंद्राचे स्थलांतर केले जावे, अशी मागणी केली, तसेच उपकरण खरेदीसंदर्भातही चर्चा केली. उपकरण खरेदीचा विषय या महिनाअखेर सोडविला जाईल. त्यासाठी ५० लाखांपर्यंत तरतूद केलेली आहे, अशी माहिती महापौरांनी दिली.