लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : आर्थिक व्यवहारांची अनियमिता प्राप्तिकर विभागाच्या रडारवर आले असून, याच्या तपासणीसाठी प्राप्तिकर विभागाकडून राज्यभर तपासणी केली जात आहे. सोमवारी जळगावातील शासकीय ठेकेदाराकडून पाच कोटींची रक्कम जप्त करण्यात आली आहे, तसेच गुरुवारी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत जालना व औरंगाबाद येथे विविध कंपन्यांची तपासणी सुरू होती.
पाच कोटींचा जळगाव ते मुंबई प्रवास
जळगाव येथील पाटील नामक शासकीय ठेकेदार सोमवारी जळगावातील कार्यालयातून मुंबई येथील कार्यालयात पाच कोटींची रोख रक्कम घेऊन जात असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी प्राप्तिकर विभागाला याविषयी कळविले. त्यादरम्यान कल्याण रोड, मुंबई येथे सदर ठेकेदाराकडून पाच कोटींची रक्कम जप्त करण्यात आली.
वेगवेगळ्या बांधकाम साइटवर कामे सुरू असल्याने त्या ठिकाणी त्या ठिकाणच्या खर्चासाठी ही रक्कम घेऊन जात असल्याचे सदरील ठेकेदाराचे म्हणणे होते. मात्र, इतक्या मोठ्या रकमेची जळगाव ते मुंबई प्रवास कशासाठी याचा तपास करण्यासाठी प्राप्तिकर विभागाने ही रक्कम ताब्यात घेतली आहे. यासंबंधी प्राप्तिकर विभागाकडून चौकशी केली जात आहे, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
प्राप्तिकर विभागाचे अतिरिक्त संचालक मारुती, उपायुक्त (अन्वेषण) अशोक मुरारी यांच्या पथकाने ही कारवाई केल्याची खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली.
औरंगाबाद, जालना येथे तपासणी
प्राप्तिकर विभागाच्या वतीने राज्यभर तपासणी करीत असताना गुरुवारी जालना व औरंगाबाद येथील पोलाद (स्टील) उद्योगाची तपासणी केली यासाठी प्राप्तिकर विभागाचे पथक सकाळपासून औरंगाबाद येथे ठाण मांडून होते, तर काही कर्मचारी जालना येथे तपासणी करीत होते.