जळगाव : अतिरिक्त कामाचा ताण व त्यात नोकरी जाण्याची भीती यामुळे तणावात आलेल्या प्रदीप धनलाल शिंपी उर्फ कापुरे (४५, रा.मयूर कॉलनी, पिंप्राळा) यांनी राहत्या घरात दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आली. शिंपी हे मुथूट होमफिन इंडिया लिमिटेड या फायनान्स कंपनीत क्रेडिट मॅनेजर या पदावर कार्यरत होते. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी कंपनीच्या लेटरहेडवर तीन पानांची चिठ्ठी लिहून ठेवली आहे. दरम्यान, फायनान्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या दबावामुळेच शिंपी यांनी आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
प्रदीप शिंपी हे १ नोव्हेंबर २०१७ पासून कंपनीत क्रेडिट मॅनेजर म्हणून कार्यरत होते. गेल्या दीड वर्षापासून त्यांच्याकडे अतिरिक्त काम सोपविण्यात आले होते. ते केले नाही तर नोकरी जाण्याची भीती होती, त्यामुळे सहा महिन्यांपासून ते निराश होते. कामाचा ताण व वरिष्ठांचा दबाव त्यामुळे त्यांनी आत्महत्येचा निर्णय घेतला. हीच कारणे त्यांनी चिठ्ठीत नमूद केले आहेत. दरम्यान, जामनेर तालुक्यातील भिरुडखेडा येथील गोसावी नावाच्या एका व्यक्तीने खोट्या कागदपत्राच्या आधारे २५ लाखांचे कर्ज घेतले व तो कर्जफेड करीत नाही, या कर्जदाराने कर्ज फेडले नाही, तर शिंपी यांना ते भरावे लागेल असे वरिष्ठांकडून त्यांना सांगितले जात होते. इतकी रक्कम कशी भरणार, यामुळे तर आत्महत्या करावी लागेल असे भावाने वारंवार आपल्याला सांगितले होते, असे त्यांच्या बहीण रेखा शिंपी यांनी ‘लोकमत’ ला सांगितले. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, कंपनी वरिष्ठ अधिकारी प्रशांत बर्गे यांनी कुटुंबीयांनी केलेले आरोप नाकारले आहेत. कुटुंबीयांनी आपल्यावर आरोप केलेले असले तरी आपण त्यांच्यावर आरोप करणार नाही. नियमानुसार कंपनीतर्फे त्यांना मदत केली जाईल असे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.