जळगाव : आसोदा रोडलगत असलेल्या खासगी शेतातून गेलेल्या रस्त्यावरून भुयारी गटार योजनेचे पाईपलाईन टाकण्यात येणार आहे. मात्र, याठिकाणी रस्ता आहे की नाही ? याच वादावरून गुरुवारी दुपारी १.३० वाजता महापालिकेत महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे यांचे पती भरत कोळी व माजी नगरसेवक संजय कोल्हे यांच्यात हाणामारी झाल्याची घटना घडली. हा वाद सुरु झाल्यानंतर लागलीच भाजप-सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करत हा वाद शांत केला. तसेच याबाबतीत आता मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत सुनावणी घेतली जाणार असल्याची माहिती मनपाकडून देण्यात आली आहे.
महापालिकेत गुरुवारी मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत शहरातील विविध प्रश्नांबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीआधी १५ व्या मजल्याच्या आवारात भरत कोळी व संजय कोल्हे यांच्यात रस्त्याचा मुद्द्यावरून शाब्दिक वादाला सुरुवात झाली. त्यात हा वाद वाढतच गेल्यानंतर दोन्हीही पदाधिकाऱ्यांमध्ये हाणामारीला सुरुवात झाली. मात्र, याठिकाणी असलेल्या काही कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी केली. त्यात वादाची माहिती मिळताच मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महापौर नितीन लढ्ढा, नगरसेवक कैलास सोनवणे यांनी याबाबत मध्यस्थी करून, दोन्ही पदाधिकाऱ्यांना शांत केले. दरम्यान, याबाबत तोडगा काढण्यासाठी मनपा आयुक्तांच्या उपस्थितीत सोमवारी सुनावणी घेतली जाणार आहे. त्यानंतर याबाबत सर्व काही स्पष्ट होणार आहे.
काय आहे वाद ..
शहरातील आसोदा रस्त्याकडील बजरंग नगर परिसरात असलेल्या संजय कोल्हे यांच्या मालकीच्या शेतातील एका रस्त्यावरून भुयारी गटार योजनेची पाईपलाईन टाकण्याचे नियोजन ठेकेदाराचे आहे. मात्र, याठिकाणी कोणताही रस्ता नसल्याचे संजय कोल्हे यांचे म्हणणे आहे. तर याठिकाणी ५० हून अधिक वर्ष जुना रस्ता असल्याचे भरत कोळी यांचे म्हणणे आहे. कोल्हे यांनी या शेतातून पाईपलाईन न टाकता रस्त्यालगत असलेले अतिक्रमण काढून त्याठिकाणाहून पाईप लाईन टाकण्याची मागणी केली आहे. तर कोळी यांनी शेतातील रस्त्यावरून ही पाईपलाईन टाकण्याची मागणी धरून ठेवली आहे. हा वाद गेल्या काही महिन्यांपासून सुरु असून, याच वादाचे रुपांतर गुरुवारी हातघाईवर आले.
कोट..
आसोदा रोडला लागून माझे शेत असून, याठिकाणी कोणताही रस्ता नाही. भुयारी गटारची पाईपलाईन टाकण्याबाबत समोरच एक रस्ता असून, त्याठिकाणचे अतिक्रमण काढण्याची गरज आहे. ते अतिक्रमण काढले जात नाही व खासगी जागेत पाईपलाईन टाकण्याबाबत आग्रह धरला जात आहे. याठिकाणी मनपाने मोजणी करून घ्यावी, असेही मी वेळोवेळी सांगितले आहे.
-संजय कोल्हे, माजी नगरसेवक
बजरंग कॉलनीत जाण्याचा हा १०० वर्ष जुना रस्ता आहे. या रस्त्यावर भुयारी गटार योजनेची पाईपलाईन गेली तर नागरिकांनाच फायदा आहे. मात्र, संजय कोल्हे यांनी या भागातील नागरिकांनी मला मतदान केले नसल्याचे सांगत, या भागासाठी पाईपलाईन जावू देण्यास नकार देत आहेत. त्यावरूनच हा वाद झाला.
-भरत कोळी.