जळगाव : कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्यामुळे याचा एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येवर मोठा परिणाम झाला आहे. उत्पन्न घटल्यामुळे पुन्हा गेल्या वर्षीप्रमाणे पगार रखडण्याची स्थिती निर्माण होते की काय, अशी चर्चा सध्या जळगाव आगारातील कर्मचारी वर्गात जोराने सुरू आहे. गेल्या वर्षी कोरोनामुळे महामंडळाची सेवा सहा महिने ठप्प होती. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार दर महिन्याला रखडत गेले. पगारासाठी कर्मचाऱ्यांना आंदोलनेही करावी लागली तर एका कर्मचाऱ्याला आत्महत्या करावी लागली. या कर्मचाऱ्याच्या आत्महत्येनंतर सरकारकडून काही महिन्यांच्या पगाराची पूर्तता करण्यात आली असली तरी, कायमस्वरूपी राज्य सरकारतर्फे पगार करण्यात येतील, असे ठोस आश्वासन देण्यात आलेले नाही. तर सध्या पुन्हा उत्पन्न घटल्यामळे येत्या ७ एप्रिल रोजी महामंडळाकडे कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी पैसे आहेत का, महामंडळ पैशांची व्यवस्था करेल का, की पुन्हा पगार रखडणार अशी प्रश्न कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.
एसटी कर्मचाऱ्यांना पुन्हा पगार रखडण्याची भीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:16 IST