सुनील पाटील
पोलिसांचा धाक संपला; की चोरट्यांची दहशत वाढली
शहरात आठवडाभरात भरदिवसा घरफोड्या, रोकड असलेल्या बॅगा लांबविणे, रस्त्याने जाणाऱ्या लोकांचे मोबाइल लांबविणे, दुचाकी चोरी अशा घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या. कहर म्हणून की काय तीन वर्षाची चिमुरडी व तिच्या आई, वडिलांच्या गळ्याला चाकूसारखे धारदार शस्त्र लावून २३ लाखांची लूट करण्यात आली. व्यापाऱ्याच्या डिक्कीतून १ लाख ६० हजार लांबविल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा वकिलाच्या दुचाकीला लावलेली अडीच लाख रुपये असलेली बॅग लांबविण्यात आली. दोन दिवसांपूर्वी तर भरदिवसा तीन घरफोड्या झाल्या. आठवड्यातील एकही दिवस असा गेला नाही की त्या दिवशी चोरी व घरफोडीची घटना घडली नाही. घटना घडत असल्या तरी त्यातील आरोपींचा शोध मात्र लागलेला नाही, उलट घटना वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे पोलिसांचा धाक संपला आहे? की चोरट्यांची दहशत वाढली आहे? घरफोडी, चोरी, लुटीची घटना घडली की, पोलीस घटनास्थळावर जातात, पंचनामा होतो, श्वान पथक येते. यासह पांढरा कागद काळा होतो, हा सोपस्कार पार पडतो. परंतु, पुढे काहीही होत नाही. पोलीस ठाण्यांकडे इतर कामे असली तरी स्थानिक गुन्हे शाखेचे कामच गुन्हे उघडकीस आणण्याचे आहे, मात्र या आठवडाभरात घडलेली एकही घटना या शाखेकडून उघडकीस आलेली नाही. पोलीस ठाण्यांचे गुन्हे शोध पथकेही निष्क्रिय झाल्याचे दिसून येत आहे. पोलीस यंत्रणेचे हे अपयश मानले जात असून ना गुंडावर वचक बसवू शकले ना चोरट्या रोखू शकले. मूळ पोलिसिंगपेक्षा इतर कामांमध्येच काही पोलिसांना रस असल्याचे दिसून येत आहे, त्यास क्षणिक स्वार्थ, सुखासाठी अधिकाऱ्यांचे पाठबळ असणे हेच घातक ठरत आहे. चोरी, घरफोड्या, दरोडा, लूट व महिला, मुलांची छेडखानी या घटनांवर नियंत्रण असणे अत्यंत गरजेचे आहे, तसे झाले तर पोलिसांविषयी जनतेत आदर वाढेल.