जळगाव : अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता विभागाच्या मुंबई, ठाणे आणि औरंगाबादच्या अधिकार्यांचा समावेश असलेल्या पथकांनी मंगळवारी आणि बुधवारी जिल्हा सहकारी दूध संघासह १६ डेअरींवर धाडी टाकल्या. यामध्ये ३ लाख ५९ हजार ९४0 रुपये किमतीचे ११ हजार ९९८ लीटर दूध आणि १0 लाख ८५ हजार ३७0 रुपये किमतीची ३ हजार ७५७ किलो स्कीम मिल्क पावडर जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त बी.यू. पाटील यांनी दिली.
दक्षता विभागाचे सहआयुक्त डी.एन.फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त ए.यू. केरूरे यांच्यासह १९ जणांच्या पथकांनी एकत्रितरीत्या जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ, बॉम्बे नागोरी मिल्क को-ऑप. सोसायटी या शहरातील संस्थासह पाचोरा, पारोळा, भडगाव, वरणगाव, भुसावळ व चाळीसगाव येथील १६ डेअरींवर सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत धाडी टाकल्या. मंगळवारी १५, तर बुधवारी पाचोर्याच्या सुशील डेअरीवर धाड टाकण्यात आली. मात्र भुसावळ येथील अमृतधारा डेअरी बंद असल्याचे आढळून आले. जिल्हा दूध संघातून क्रीम मिल्क, शक्ती पाश्चराईज्ड मिल्क, टोन् मिल्क, म्हशीच्या दुधाचे चार नमुने घेण्यात आले आहेत.
या डेअरींवर टाकल्या धाडी
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघ, सर्मथ डेअरी (भडगाव), निकेत चिलिंग सेंटर (वरणगाव), भारत डेअरी (पाचोरा), श्रीकृष्ण डेअरी (पाचोरा), श्रीकृष्ण डेअरी (पारोळा), शीतल डेअरी (पारोळा), गणेश (दर्शन डेअरी, चाळीसगाव), बॉम्बे नागोरी मिल्क को-ऑप. सोसायटी (जळगाव), अमर डेअरी (बोदवड), मंगलमूर्ती डेअरी (चाळीसगाव), अपेक्षा डेअरी (चाळीसगाव), हेमराज डेअरी (चाळीसगाव), ममता डेअरी (चाळीसगाव), सुशील डेअरी (भडगाव), अमृतधारा डेअरी (भुसावळ).
येथे केली कारवाई
गणेश (दर्शन डेअरी) चाळीसगाव
९0 हजार रुपये किमतीचा ३ हजार लीटर मिक्स दूधसाठा, ३ लाख १४ हजार ७९0 रुपये किमतीची १ हजार ४९९ किलो स्कीम मिल्क पावडर, १ लाख ३६ हजार ४00 रुपये किमतीचा स्कीम मिल्कसाठा जप्त केला.
बॉम्बे नागोरी मिल्क को-ऑप. सोसायटी, जळगाव - २ लाख ६९ हजार ९४0 रुपये किमतीचे ८ हजार ९९८ लीटर दूध, तसेच २ लाख ९९ हजार ४00 रुपये किमतीची ९९८ किलो स्कीम मिल्क पावडर जप्त करण्यात आली.
मंगलमूर्ती डेअरी, चाळीसगाव-२ लाख ८0 हजार ५0 रुपये किमतीची ५६५ किलो स्कीम मिल्क पावडर जप्त.
अपेक्षा डेअरी, चाळीसगाव - ५४ हजार ७३0 रुपयांची १९९ किलो स्कीम मिल्क पावडर
हेमराज डेअरी, चाळीसगाव - ३ लाख ५९ हजार ९४0 रुपये किमतीचे ११ हजार ९९८ लीटर दूध आणि १0 लाख ८५ हजार ३७0 रुपयांची ३ हजार ७५७ किलो दूध पावडर.
------------
१६ डेअरींवर टाकण्यात आलेल्या धाडीमध्ये पथकांनी गायीचे-म्हशीचे दूध, प्रमाणित दूध, मिक्स मिल्क, स्कीम मिल्क पावडर, टोन् मिल्क आदींचे २६ नमुने घेतले आहेत.
नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. विविध डेअरींमध्ये आढळून आलेले भेसळीचे ११ हजार ९९८ लीटर दूध घटनास्थळीच नष्ट केले असून ७ हजार ७५७ किलो स्कीम मिल्क पावडर जप्त केली आहे.
-------------
प्रथमदर्शनी करण्यात आलेल्या तपासणीमध्ये मिक्स, गायीच्या व म्हशीच्या दुधामध्ये स्कीम मिल्क पावडरची भेसळ करण्यात आली असल्याचे आढळून आले आहे. भेसळ करणार्या डेअरींचे परवाने रद्द, निलबित करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. अहवाल आल्यानंतर कारवाईबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त बी.यू.पाटील यांनी सांगितले.