जळगाव : जागतिक अपंग दिन साजरा होत असतानाच दिव्यांगांनी आपल्या मागण्यांसाठी महापालिकेच्या समोर उपोषण सुरू केले आहे. त्याला पाठिंबा देण्यासाठी दिव्यांग सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रसाद साळवी हे भेट देणार आहेत.
यावेळी राज्य सचिव भरत महाजन, जिल्हाध्यक्ष दत्तात्रय महाजन, शकिल शेख उपस्थित होते. यावेळी दिव्यांग सेनेतर्फे विविध मागण्या करण्यात आल्या. त्यात महापालिकेने दिव्यांगाना आतापर्यंत पाच टक्के राखीव निधीचे वाटप केले नाही. ते त्वरीत करण्यात यावे, मनपाच्या व्यापारी संकुलात दिव्यांगांना गाळे उपलब्ध करून देण्यात यावे. मनपाच्या जागेत दिव्यांगांना झुणका भाकर केंद्रासाठी २०० चौरस फुट जागेत परवानगी मिळावी. मनपाच्या दवाखान्यात दिव्यांगांना मोफत उपचार मिळावे. स्वयंरोजगारासाठी मनपाच्या जागेत स्टॉल लावण्याची परवानगी मिळावी. गतीमंद मुलांना सहाय्य अनुदान द्यावे, तसेच औषधोपचार मोफत द्यावेत. दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी फोटोकॉपी मशिन देण्यात यावे. घरकुल योजन देणे, कर्णबधिरांना श्रवण यंत्रे, शैक्षणिक संच, संवेदन उपकरणे, संगणकासाठी सहायक बुथ उभारणे यासाठी सहाय्य करण्याच्या मागण्या करण्यात आल्या. उपोषणाला हरीराम तायडे, शकील शेख, योगिता जाधव, इकमोद्दीन शफियोद्दीन शेख, संगीता प्रजापत, किशोर नेवे, प्रदीप चव्हाण, ज्ञानेश्वर पाटील, नितीन सुर्यवंशी, भीमराव म्हस्के, तोसिफ शहा, मिलींद पाटील, गणेश पाटील, मतीन शेख हे बसले आहेत.