दीपनगर, ता. भुसावळ : ज्या प्रकल्पग्रस्त प्रशिक्षणार्थींना महानिर्मिती मध्ये तीन वर्षे पूर्ण झाली आहेत, त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घ्यावे व एक हजार पदांची भरती करावी या मागणीसाठी दीपनगर वीज निर्मिती केंद्रातील प्रकल्पग्रस्त प्रगत कुशल प्रशिक्षणार्थी कृती समितीच्या वतीने १३ पासून ८ प्रकल्पग्रस्तांनी भुसावळ येथील वीजनिर्मिती केंद्राच्या २१० मेगावॅट गेटसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.यापूर्वी आपल्या विविध मागण्यांसाठी प्रकल्पग्रस्तांनी आंदोलने केली परंतु कंपनीने कुठलेही आश्वासन पूर्ण केले नसल्याने प्रकल्पग्रस्त कृती समितीच्यावतीने भुसावळसह राज्यातील सातही औष्णिक विद्युत केंद्रातील प्रगत कुशल प्रकल्पग्रस्तांनी उपोषण सुरू केलेले आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तो पर्यंत उपोषण सुरूच राहणार असा निर्णय घेण्यात आला असल्याची कृती समितीचे दीपनगर शाखाध्यक्ष रत्नदीप बोरोले यानी दिली. उपोषणास रुपेश दिलीप पाटील, आशिष हिरामण पाटील, संदीप एकनाथ कोळी, गुलाबराव जमदाडे, बाळु लक्ष्मण तायडे, कमलेश तुळशीराम पाटील हे बसले असून उपाध्यक्ष नितीन कोळी, सचिव संदीप कोळी, सल्लागार रुपेश पाटील, हेमंत बोरोले आदी उपस्थित होते.
प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2020 21:37 IST