जळगाव : राजस्थानात भावाच्या मुलीच्या साखरपुड्यासाठी गेलेल्या रामप्रताप किसनराव सैनी (वय ४२) यांच्या घरात त्यांच्या गैरहजेरीत चोरट्यांनी धुमाकूळ घालून २५ हजार रुपये रोख व ७५ हजार रुपयांचे दागिने असा एक लाख रुपये किमतीचा ऐवज चोरट्यांनी लांबविल्याची घटना शनिवारी सकाळी रामेश्वर कॉलनीत उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजस्थानातील रहिवासी असलेले रामप्रताप सैनी हे २० वर्षापासून रामेश्वर कॉलनीतील विश्वकर्मा नगरात कुटुंबियांसह वास्तव्याला आहेत. घरांमध्ये टाईल्स व फरशी बसविण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. २ जुलै रोजी भावाच्या मुलीचा साखरपुडा असल्याने सैनी हे १ जुलै रोजीच चौकडी, ता.खंडेला जि.सिकर (राजस्थान) येथे गेले होते. जातांना घराचा दरवाजा बंद केला होता. काही रक्कम व दागिने त्यांनी घरातच ठेवले होते. शनिवारी सैनी कुटुंबियांसह घरी परतले असता घराचा कडीकोयंडा तुटलेला होता तर आतमध्ये साहित्याची नासधूस झालेली होती. लाकडी कपाटात ठेवलेले २५ हजार रुपये २५ हजार रुपये किमतीची पाच ग्रॅमची सोन्याची महिलेची अंगठी, २५ हजार रुपये किमतीचा पाच ग्रॅमचा सोन्याचा माग टिका व २५ हजार रुपये किमतीची पाच ग्रॅमची सोन्याची पुरुषाची अंगठी असे ७५ हजार रुपयांचे दागिने व रोकड एकूण लाख रुपयांचा मुद्देमाल गायब झालेला होता.
घरात चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर सैनी यांनी एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.