लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : ग्रामीण भागात महाविकास आघाडीचे वर्चस्व सिद्ध झाले आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालावरून यापुढे ग्रामीण भागात आमची सत्ता अबाधित राहील, हे स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात तर भाजप नावापुरता, काही गावांपुरता उरला आहे. शिवसेनेच्या बाबतीत बोलायचे झाले तर राज्यभर शिवसेनेने मजबूत आघाडी घेतली आहे, असा दावा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकींचे निकाल सोमवारी जाहीर करण्यात आले. या निकालांच्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटील हे पत्रकारांशी बोलत होते. या निकालांवर एक नजर टाकली तर ग्रामीण भागातील मतदारांनी महाविकास आघाडी सरकारच्या कामगिरीवर शिक्कामोर्तब केल्याचे आपल्याला दिसून येत आहे. कोरोना, अतिवृष्टी यासारख्या नैसर्गिक संकटांमध्येही महाविकास आघाडी सरकारने चांगली कामे केल्याने ग्रामीण भागातील जनतेने आमच्यावर विश्वास दाखवला आहे, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली.