एरंडोल : तालुक्यात शासनाने निर्धारित केलेल्या कमाल किमतीऐवजी जादा दराने खतांची विक्री होत असल्याच्या तक्रारी पुढे येत आहेत.
पाऊस लांबणीवर पडल्यामुळे पेरण्या खोळंबल्या असताना जादा दराने खताच्या विक्रीचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे. दरम्यान, पंचायत समिती कृषी अधिकारी बी. एस. मोरे यांनी खताच्या गोणीवर नमूद दरापेक्षा जास्त दराने खते खरेदी करू नये, असे आवाहन केले आहे. जादा दराने खत विक्री होत असल्याचे निदर्शनास आल्यास तालुका कृषी अधिकारी कृषी अधिकारी पंचायत समिती, एरंडोल यांच्याकडे त्वरित तक्रार करावी, असे कळविण्यात आले आहे.
एरंडोल तालुक्यात लागवडीलायक क्षेत्र ४० हजार ७८० हेक्टर असून, कापूस पिकाखाली सुमारे २३ हजार हेक्टर आहे. तालुक्यासाठी एकूण १२ हजार ३१३ मेट्रिक टन खताची गरज आहे. शेतकऱ्यांनी फक्त युरिया खताचा वापर न करता इतर उपलब्ध सरळ, मिश्र, व संयुक्तिक खतांचा वापर करावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.