वरणगाव, ता. भुसावळ : येथील सहकार आघाडीचे मिलिंद देवीदास भैसे यांचा मुलगा तनिष्क याने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांचे हुबेहुब क्ले मॉडेल तयार करून पोलीस अधीक्षकांना भेट दिले आहे. मातीपासून बनविलेल्या स्वतःच्या प्रतिकृतीमुळे पोलीस अधीक्षक डॉ.मुंडे भारावले.
यावेळी ते म्हणाले, माझे हुबेहुब क्ले मॉडेल व स्केच या युवा कलाकाराने एवढ्या कमी वयात बनविले आहे. हे पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला आहे. तनिष्कने एवढ्या लहान वयात महापुरुष व देवदेवतांचे अनेक मातीचे पुतळे तयार केले आहेत. भविष्यात हा युवक मोठा कलाकार होऊन वरणगावचे नाव देशभरात चमकवेल, असा विश्वासही. पोलीस अधीक्षकांनी व्यक्त केला आणि वरणगावला तनिष्कच्या घरी जाऊन बनविलेल्या सर्व कलाकृती पाहण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. तनिष्कला भविष्यात वैयक्तिक प्रयत्न करण्याचे व जी मदत लागेल ती करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, संतोष कश्यप, तनिष्कचे वडील मिलिंद भैसे उपस्थित होते.